पुणे – मास्क न लावल्याची विचारणा केल्यामुळे सोसायटी चेअरमनला बदडले, तिघांना अटक

1001
crime

कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी सोसायट्या खबरदारी घेत आहे. मात्र, काही जणांकडून नियमांचे उल्लंघन करीत अरेरावीपणा केला जात असल्याचे दिसून आले आहे. सोसायटीत प्रवेश करताना मास्क का लावला नाही, अशी विचारणा करणाऱ्या चेअरमनला चौघा तरुणांनी बांबूने बेदम मारहाण केली. त्यामुळे त्यांचा डोळा, पाठ आणि हाताला जखम झाली आहे. याप्रकरणी तिघाजणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. ही घटना दोन दिवसांपूर्वी आंबेगाव खुर्द परिसरातील साईसमर्थ नगरीमध्ये घडली.

कृष्णा बबन लोखंडे (वय 22), अजय भगवंत घाडगे (वय 21 दोघेही रा. शनिनगर, आंबेगाव खुर्द ) आणि अनिल संभाजी नेटके (वय 21, रा. लिपाणेवस्ती, आंबेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अमित पाटील (वय 39, रा. आंबेगाव खुर्द ) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित हे साईसमर्थ नगरी सोसायटीचे चेअरमन आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून त्यांनी सर्व सोसायटी रहिवाशांना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. दोन दिवसांपूर्वी चार वाजण्याच्या सुमारास कृष्णा, अजय आणि अनिल एका साथीदारासह साईसमर्थनगरी सोसायटीत मित्राला भेटायला आले होते. त्यावेळी त्यांनी मास्क घातला नव्हता. त्यामुळे सोसायटीच्या पार्किंगमध्ये असताना अमितने चौघांना मास्क का घातला नाही, अशी विचारणा केली. त्याचा राग आल्यामुळे चौघांनी मिळून अमितला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पार्किंगमधील बांबू घेउन त्यांच्या पाठीवर आणि हातावर मारुन जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक करुन त्यांच्या एका साथीदाराचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक ए. आर. कवठेकर अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या