पिस्तूलाच्या धाकाने डॉक्टर दाम्पत्याला लुटले, कात्रज बोगद्यातील घटनेमुळे खळबळ

crime

खेड-शिवापूर परिसरातील हॉटेलमध्ये जेवण करुन आल्यानंतर कात्रजच्या बोगद्यानजीक लघुशंका करण्यासाठी थांबलेल्या डॉक्टरला दुचाकीस्वार चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून दागिन्यांसह 1 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना काल मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास नवीन कात्रज बोगदा परिसरालगत घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी डॉ. चिन्मय विठ्ठल देशमुख (वय -32, रा. बिबवेवाडी) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. चिन्मय आणि त्यांच्या पत्नी काल संध्याकाळी खेड शिवापूर परिसरातील हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर रात्री सव्वा बाराच्या सुमारास दोघेही मोटारीतून पुण्याकडे परतत होते. त्यावेळी डॉ. चिन्मय यांनी लघुशंका करण्यासाठी मोटार रस्त्यालगत थांबविली होती. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार चोरट्यांनी डॉ. चिन्मय यांना पिस्तूलाचा धाक दाखविला. त्यांच्याकडे पैशांची मागणी करीत पत्नीकडील दोन सोन्याच्या अंगठ्या, मनगटी घड्याळ असा मिळून 1 लाख 20 हजारांचा ऐवज चोरुन नेला.

परिसरातील अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी दाम्पत्याला लुटले आहे. त्याठिकाणी सीसीटीव्ही नसल्यामुळे तपासाकार्यात अडथळा असल्याचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या