शहरात चोरट्यांचा धुडगूस सुरुच, महिला पोलिसाच्या फ्लॅटसह 5 ठिकाणी घरफोडी

शहरातील विविध भागात चोरट्यांनी घरफोड्या करीत धुडगूस घातला आहे. मागील काही दिवसांपासून घरफोडींच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरट्यांनी केलेल्या घरफोडीत महिला पोलिसाच्या फ्लॅटसह 5 ठिकाणी घरफोडी केली आहे. त्यामध्ये फरासखाना, विश्रामबाग, कोंढवा, अलंकार भागात चोरी करुन दीड लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार कावेरी दोरगे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कावेरी दोरगे कुटूंबियासह शिवाजीनगर परिसरात राहायला आहेत. त्यांचा एक फ्लॅट कोंढवा परिसरातील श्रीकुंज सोसायटीत असून तो बंद आहे. चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला आहे. त्याशिवाय कोदरे यांच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीचा बंद फ्लॅट फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, चोरट्यांच्या हाती काही लागलेले नाही.

दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी दारुवाला पूलाजवळील दुकानाचे शटर उचकटून 12 हजारांची रोकड चोरुन नेली. याप्रकरणी महावीर जैन (वय 40, रा. सोमवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जैन यांचे दारुवाला पुलाजवळ ज्युनिअर किड्स नावाने दुकान आहे. दोन दिवसांपुर्वी दुकान बंद असताना चोरट्यांनी शटर उचकटून 12 हजार रुपये चोरुन नेले आहेत. तिसऱ्या घटनेत चोरट्यांनी विश्रामबाग येथील राजेंद्रनगर पीएमसी कॉलनीत घरफोडी करुन 1 लाख 46 हजारांचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी संज्योत कोढरे (वय 35) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजेंद्र पीएमसी कॉलनीत राहण्यास असून ते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून 1 लाख 46 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. राजेंद्र घरी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. चौथ्या घटनेत चोरट्यांनी कर्वे रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू वसाहतीत राहणाऱ्या दीपक शेडगे यांचा फ्लॅटची कडी तोडून 5 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

बीटमार्र्शल आणि गुन्हे शाखेला आलीय मरगळ

शहरात घरफोडीच्या घटनांमुळे बीटमार्शल, दामिनी पथक, गुन्हे शाखेच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. मागील 15 दिवसांपासून चोरट्यांनी ठिकठिकाणी घरफोड्यांचे सत्र कायम ठेवले आहे. त्यामुळे प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे शाखा आणि बीट मार्शलांची मरगळ दूर कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

”परिमंडळ एकमध्ये मालमत्ता गुन्ह्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे. फरासखाना आणि विश्रामबाग परिसरात झालेल्या घरफोड्यांचे तपास सुरु असून, लवकरच चोरट्यांना अटक करण्यात येईल.” – स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक

आपली प्रतिक्रिया द्या