सावधान! शहरात चोरांचा सुळसुळाट, नागरिकांमध्ये घबराट

शहरातील विविध भागात चोरट्यांनी हैदोस घातला असून घरफोडी, मोबाईल चोरी, सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी मागील दोन दिवसांत ससून हॉस्पीटल रस्त्यावर, वारजे, सय्यदनगर, एनआयबीय चौक तसेच गोकुळनगर परिसरात नागरिकांना लक्ष्य करून 2 लाख 35 हजारांचा ऐवज चोरून नेला. त्याशिवाय सहकारनगरमध्ये जबरी चोरीत 5 लाखांचा ऐवज लंपास केला आहे.

ससून रस्त्यावरून जात असताना दुचाकीस्वार चोरट्याने तरूणाचा मोबाईल चोरून नेला होता. याप्रकरणी सराईत गुन्हेगार रोहित विजय शिंदे (21, रा. भगवा चौक, कासेवाडी) याला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वांजळे करत आहेत. दुसऱ्या घटनेत दुचाकीस्वार चोरट्यांनी वारजे येथील स्मशानभुमीपासून रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील 1 लाख 86 हजार रूपये किंमतीची सोनसाखळी चोरून नेली. ही घटना मंगळवारी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अलका दिलीप फडतरे (वय 60, रा. वास्तुशिल्प सोसायटी, धायरी) यांनी तक्रार दिली आहे.

वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सय्यदनगर रेल्वेच्या अंडरग्राऊंड रस्त्याजवळ नितीन कांतीलाल मोहिते (35, रा. साई सिध्दी चौक, आंबेगाव पठार, धनकवडी) यांच्यावर दगडफेक करून चोरट्यांनी त्यांचा मोबाईल हिसकाऊन चोरून नेला. याप्रकरणी शादाब युसुफ अन्सारी (19, सय्यदनगर) आणि फैय्याज सिरा जुद्दीन अन्सारी (21, रा. आदर्शनगर, उरूळी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय कार्यालय सुटल्यानंतर एनआयबीएम चौकात नवऱ्याची वाट पाहणाऱ्या महिलेचा चोरट्यांनी महागडा मोबाईल चोरून नेला. ही घटना 21 जून सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी साक्षी विकास लाड (25, रा. वानवडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच प्रवासाचे जादा पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून चालकाने महिलेच्या पर्समधील 27 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना कोंढव्यातील गोकुळनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी शिवानी राहुल मेमाणे (35, रा. गोकुळनगर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

धनकवडीत पाच लाखांची घरफोडी

फ्लॅटचे कुलूप उचकटून चोरट्यांनी 5 लाख रूपयांची रोकड लांबविल्याचा धक्कादायक प्रकार धनकवडीतील राजमुद्रा सोसायटीत घडली. याप्रकरणी तुषार मोहन भरगुडे (वय 38, राजमुद्रा सोसायटी, धनकवडी) यांना सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मंगळवारी सकाळी नऊ ते दुपारी सव्वा एकच्या दरम्यान घडला.

आपली प्रतिक्रिया द्या