प्रियकराच्या मदतीने केला सैनिक पतीचा खून ;चौघांना अटक

1022

प्रियकराच्या मदतीने उच्चशिक्षित पत्नीने सुट्टीवर आलेल्या सैनिक पतीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह हवेली तालुक्यातील खेडशिवापूर हद्दीतील पुणे—सातारा महामार्गालगत हॉटेलच्या बाजूला फेकून दिला. याप्रकरणाचा राजगड पोलिसांनी आठवड्याभरात छडा लावून चारजणांना अटक केली. ही घटना 7 नोव्हेंबर रोजी रात्री 7 वाजता घडली.

संजय पांडुरंग भोसले ( 38, सध्या रा. रहाटणी, पुणे. मूळ रा. एकसळ, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे सैनिकाचे नाव आहे. याप्रकरणी संजय यांची पत्नी शीतल भोसले ( 29, रा. एकसळ, ता. कोरेगाव, जि. सातारा), योगेश कमलाकरराव कदम (२९, रा. रहाटणी पुणे), मनीष नारायण मदने, (32, रा. आदर्शनगर-काळेवाडी, पुणे) आणि राहुल अशोक काळे (35, रा. नखातेनगर-काळेवाडी, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. उपनिरीक्षक समीर कदम यांनी याबाबत फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडशिवापूर येथील पुणे-सातारा महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलच्या बाजूला 8 नोव्हेंबर रोजी एका पुरुषाचा मृतदेह आढळला. राजगड पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाजवळ मिळालेल्या ओळखपत्रावरून ते हिंदुस्थानी सैन्य दलातील सैनिक संजय भोसले असल्याचे समोर आले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान संजय यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले.

संजय हे नुकतेच महिन्याभराच्या सुट्टीवर आले होते. दरम्यानच्या काळात त्यांची पत्नी शीतल व योगेश कदम यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. याबाबत संजय यांना कुणकुण लागल्याने त्यांचे शीतलबरोबर सतत वाद होत होते. याचा राग मनात धरून शीतलने तिचा प्रियकर योगेश यांनी संजय यांचा खून करण्याचा कट रचला. त्यानुसार 7 नोव्हेंबर रोजी सांयकाळी 7 वाजता रहाटणी येथील घरी शीतलने संजय यांना ग्लासमध्ये पिण्याच्या पाण्यातून विषारी गोळी दिली. यामध्ये संजय यांचा मृत्यू झाला. शीतलने याची माहिती योगेशला एसएमएसद्वारे कळविले. त्यानंतर योगेशने मनीष मदने आणि राहुल काळे या साथीदारांच्या मदतीने भाड्याने केलेल्या कारमधून संजय यांचा मृतदेह आणून खेडशिवापूर येथे महामार्गालगत फेकून दिल्याची आरोपींनी कबुली दिली.

आपली प्रतिक्रिया द्या