पुणे – दारुसाठी चोरट्यांची तगमग; फोडली वाईनशॉपी, पावणेतीन लाखांची दारु चोरीला

कोरोनामुळे पहिल्या लॉकडाउनपासून सर्व आस्थापना बंद असल्यामुळे तळीरामांना दारु मिळाली नाही. त्यामुळे अनेकांची चांगलीच गोची झाली होती. लॉकडाउन सुरू होण्याआधी चोरट्यांनी दोन दिवसांपूर्वी जुना मुंढवा रस्त्यावरील वाईन शॉपी फोडून तलफ भागविली आहे. वाईन शॉपीचे शटर उचकटून चोरट्यांनी रोकडसह तब्बल 2 लाख 70 हजारांची दारु चोरुन नेली आहे. याप्रकरणी समीर जैस्वाल (वय 30) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील जुना मुंढवा रस्त्यावर जैस्वाल यांच्या मालकीचे वाईन सेंटर आहे. दोन दिवसांपूर्वी ते वाईनशॉपी बंद करुन घरी गेले होेते. त्यावेळी चोरट्यांनी वाईन शॉपीचे शटर उचकटून आतील दरवाजाची काच फोडली. त्यानंतर गल्ल्यातील रोकडसह दारु असा तब्बल 2 लाख 70 हजारांचा दारुसाठा चोरून नेला. सकाळी वाईन शॉपी उघडण्यासाठी आलेल्या जैस्वाल यांना चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व्ही. पी. कुलकर्णी तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या