ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन महिलेचा मृत्यू, चालकावर गुन्हा दाखल

ट्रॅक्टरमधून खाली पडल्यानंतर ब्रेक न लागल्याने चाकाखाली सापडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना महमंदवीडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर वानवडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदा अशोक यादव (44, रा. राजीव गांधी कॉलनी, तरवडे वस्ती, महमंदवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक महावीर अर्जुन पटेकर (रा. कवडेपाठ, सिध्दार्थनगर, कदमवाकवस्ती, लोणी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महमंदवाडी पोलीस चौकीच्या मागे तरवडेवस्ती येथे यादव यांच्या घराचे काम सुरू आहे. संबंधित कामासाठी आवश्यक असणारे साहित्य घेऊन नंदा मंगळवारी दुपारी ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून घरी चालल्या होत्या. परंतु, तरवडे वस्तीवर जाण्यासाठी मोठा चढ आहे. ट्रॅक्टर चढावरून जात असताना तोल जाऊन नंदा यादव अचानक खाली पडल्या. त्यानंतर चालक महावीर यांनी ट्रॅक्टरवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, उतारामुळे ब्रेक न लागल्याने ट्रॅक्टर न थांबता नंदा यादव यांच्या बरगडीला त्याचे चाक लागले. चाकाच्या धक्क्यात त्यांच्या बरगडीची हाडे तुटली आणि फुफुस्सामध्ये घुसल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या