
पुण्यात राहणाऱ्या महिलेची सायबर चोरट्याने चक्क अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची खोटी सही दाखवून फसवणूक केली. संबंधित महिला ही एलआयसीच्या निवृत्त कर्मचारी आहेत.
पुणे शहर सायबर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबरमध्ये निवृत्त महिला कर्मचाऱ्याची फसवणूक झाली आहे. ही महिला कोथरुड येथे राहत होती. एका व्यक्तीचा त्यांना फोन आला होता. जो स्वतःला डेटा प्रोटेक्शन एजन्सीचा अधिकारी असल्याचे सागंत होता. त्याने आरोप केला आहे की, महिलेच्या आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नंबर संशयास्पद व्यवहारांसाठी वापरला जात होता. त्यानंतर महिलेचे दुसऱ्या व्यक्तीशी बोलणे करून दिले. ज्याने आपली ओळख वरिष्ठ पोलीस अधिकारी अशी सांगितली आणि नाव जॉर्ज मॅथ्यू असे सांगितले. विशेष म्हणजे त्यांचे हे बोलणे व्हिडीओ कॉ़लच्या माध्यमातून सुरू होते. आरोपीने त्या महिलेवर मनी लाँड्रिंगचे आरोप लावले. शिवाय बॅंक खाती फ्रीज करण्याची धमकी दिली. आरोपीने सीतारामन यांची खोटी सही असलेले कागदपत्रेही दाखवली. त्यानंतर महिलेचे वय पाहता त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात येईल. शिवाय संपूर्ण पैसे तुम्हाला रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियाच्या खात्यात टाकावे लागतील. महिलेला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला आणि तिने तब्बल 99 लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यांनी महिलेला विश्वास दाखवण्यासाठी महिलेसमोर ईडीने खोटी रिसिप्टही दाखवली, असा त्याने आरोप केला. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
महिलेने त्यांच्याशी पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांचा फोन बंद येत होता. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली. इथे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बॅंक खाती आणि फोन नंबरचा तपास सुरू केला आहे. वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या सह्या दाखवून फसवणूक करणं चिंतेचा विषय असल्याचे डीसीपी यांनी सांगितले.




























































