Puneeth Rajkumar प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, अकाली निधनामुळे चाहते हादरले

दाक्षिणात्य अभिनेता पुनीत राजकुमार (वय-46 वर्षे) याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. हा झटका इतका जीवघेणा होता की त्याचा मृत्यू झाला. त्याच्या निधनाचे वृत्त कळताच पुनीतचे चाहते बंगळुरूतील विक्रम हॉस्पीटलबाहेर जमा झाले आहेत. तिथली गर्दी वाढतच चालली असल्याचं कळतं आहे. अभिनेता महेश बाबू याने ट्विट करत पुनीत याच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. पुनीत हा आतापर्यंत भेटलेल्या व्यक्तींमधील सर्वात नम्र व्यक्ती  होता असं महेश बाबू याने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने देखईल पुनीतच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत ट्विट केलं आहे. या वृत्तामुळे आपल्याला जबर धक्का बसला असल्याचं तिने ट्विटमध्ये लिहिलं आहे.

शुक्रवारी सकाळी व्यायाम करत असताना पुनीतला अस्वस्थ वाटायला लागलं होतं. जिममध्येच हृदयविकाराचा झटका आल्याने पुनीत कोसळला होता. त्याला तातडीने बंगळुरूतील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर आयसीयूमधअये उपचार सुरू होते, मात्र डॉक्टर त्याचा जीव वाचवू शकले नाहीत. पुनीतला रुग्णालयात दाखल केल्याचं कळताच तिथले मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, विरोधी पक्षनेते सिद्धरमय्या, अभिनेता यश , दर्शन, रवीचंद्रन यांनी रुग्णालयात धाव घेतली होती. पुनीतचे चाहतेही रुग्णालयाबाहेर जमा झाले असून तिथे मोठी गर्दी झाली आहे. पुनीतचे वडील राजकुमार हे देखील प्रसिद्ध अभिनेते होते. अभिनयासोबतच, गायक, निर्माता, कार्यक्रमांचा सूत्रसंचालक म्हणूनही पुनीत प्रसिद्ध होता.

पुनीत याचे वडील राजकुमार यांचे चंदन तस्कर वीरप्पन याने 30 जुलै 2000 मध्ये अपहरण केले होते. ते तब्बल 108 दिवस वीरप्पनच्या तावडीत होते. राजकुमार यांच्यासह त्यांचा जावई गोविंदराज याचेही अपहरण करण्यात आले होते. राजकुमार यांना सोडण्याच्या बदल्यात वीरप्पनने  1 हजार कोटी रुपये मागितले होते असं शिवा सुब्रमण्यम नावाच्या पत्रकाराने लिहिलेल्या पुस्तकात म्हटलं आहे. प्रत्यक्षात वीरप्पनला त्यावेळी 15 कोटी रुपये तीन टप्प्यात दिले होते अशी माहिती शिवा यांच्या पुस्तकात दिली आहे.