भाजपच्या माजी आमदाराची अशीही ‘कृपा’, भर उन्हात विद्यार्थ्यांना पाणी भरण्याची ‘शिक्षा’

27

सामना ऑनलाईन, मुरबाड

ठाणे जिह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके मोठ्या प्रमाणावर बसू लागले असून भाजपचे माजी आमदार दिगंबर विशे यांनी सुरू केलेल्या मृण्मयी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना तर भर उन्हात पाणी भरण्याची ‘शिक्षा’ सहन करावी लागत आहे. टँकरने पाणीपुरवठा होत नसल्याने आश्रमशाळेपासून अर्धा किलोमीटर अंतरावर पायपीट करीत बोअरिंगचे पाणी रोज विद्यार्थी आणत आहेत. उन्हाचे चटके खात रस्ता ओलांडून मुले आश्रमशाळेसाठी पाणी भरत असून हेच का भाजप सरकारचे अच्छे दिन…. असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. ज्या हातात रोज पाटी, पुस्तक, दप्तर घ्यायचे त्या कोवळ्या हातात पाण्याच्या जड बादल्या बघून अनेकांचे हृदय पिळवटत असले तरी सरकारच्या हृदयाला अजून पाझर फुटलेला नाही. आश्रमशाळेसाठी हातात पाण्याच्या जड बादल्या घेऊन पाणी आणायचे की अभ्यास करायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

एकेकाळी मुरबाडच्या राजकारणातील बडे प्रस्थ असलेले भाजपचे दिगंबर विशे यांनी आपल्या आमदारकीच्या काळात दहा ते पंधरा वर्षांपूर्वी मुरबाड-माळशेज हायवेवरील तळवली गावच्या हद्दीत मृण्मयी आदिवासी आश्रमशाळा सुरू केली. ही निवासी आश्रमशाळा असून सध्या तिथे साडेतीनशे आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेतात. हा भाग पाणीटंचाईचा असल्याने दरवर्षी येथील आश्रमशाळेला टँकरने पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. मात्र शाळा, अभ्यास सोडून असंख्य विद्यार्थी रोज अनवाणी भर उन्हात हातात पाण्याच्या बादल्या घेऊन चालत अर्धा किलोमीटरवर जातात व तेथील बोअरवेलचे पाणी आणत आहेत. पाणी आणताना मुलांना रस्ता ओलांडून जावे लागते. दुर्दैवाने एखादा अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल पालक व रहिवाशांनी केला आहे.

समाजकल्याण विभागाचा भोंगळ कारभार तसेच विद्यार्थ्यांच्या जीवावर केले जाणारे राजकारण याचे चटके येथील मुला-मुलींना सहन करावे लागत आहेत. मुरबाड-माळशेज मार्गावर असलेल्या अनेक आदिवासी पाडे तसेच वाड्यांवर सध्या भीषण पाणीटंचाई सुरू झाली असून टँकरने पाणीपुरवठा काही भागात केला जातो. भाजपचे माजी आमदार दिगंबर विशे यांनी मोठ्या हौसेने मुरबाडमध्ये आदिवासी आश्रमशाळा सुरू केली, पण विद्यार्थ्यांच्या अडीअडचणींकडे त्यांचे दुर्लक्ष झाले असून पाणीसुद्धा मुलांनाच आणावे लागत असल्याने ‘अच्छे दिन’च्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या आहेत. आश्रमशाळेतील कारभाराची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

पावसाळ्यात गळती, थंडीत नदीवर आंघोळ
मृण्मयी आश्रमशाळेची दुर्दशा झाली असून दर पावसाळ्यात लागणाऱ्या गळतीमुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसणेही मुश्कील होते. आंघोळ करण्याची पुरेशी सोय नसल्याने मुलांना थंडीच्या दिवसातही नदीवर जाऊन आंघोळ करावी लागते. याबाबत काही पालकांनी अनेकदा तक्रारी करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे उन्हाळा, पावसाळा असो की हिवाळा.. तीनही ऋतूंमध्ये मुलांचे हाल होत आहेत. किमान पाणी भरण्यापासून तरी आमची सोडवणूक करा, अशी मागणी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या