PMC बँक खातेदारांना पैसे काढण्यास परवानगी मिळणार का?

681

पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र (पीएमसी) बँकेतील खातेदारांना त्यांच्या खात्यातून 5 लाखापर्यंतची रोख रक्कम काढण्यासंदर्भात परवानगी देण्याबाबत केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकार, आरबीआय आणि पीएमसी बँकेला नोटीस देखील पाठविली आहे. त्यामुळे केंद्र सरकार आता यासंदर्भात कोणती घोषणा करते, याकडे बँकेच्या खातेदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोरोनाच्या काळात वैद्यकीय उपचारासाठी पाच लाख रुपये काढण्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ता बेजोन कुमार मिश्रा यांनी  खातेदारांवतीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती डीएन पटेल आणि न्यायमूर्ती प्रतिक जालान यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने केंद्र सरकार, भारतीय रिझर्व्ह बँक आणि पीएमसी बँकेला नोटीस पाठवित ही विचारणा केली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 ऑगस्ट रोजी होणार आहे.

मिश्रा यांचे वकील शशांक देव यावेळी म्हणाले की, न्यायालयाने मागील सुनावणीत आम्हांला केंद्र सरकार, आरबीआय आणि पीएमसी बँकेसमोर खातेदारांना सामोरे जावे लागणाऱ्या अडचणी आणि आमची बाजू मांडण्यास सांगितले होते. त्यानुसार आम्ही आमची भूमिका मांडली होती. मात्र त्यानंतरही बँकेने यासंदर्भात कोणतीही कारवाई केलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. बँकेने डिसेंबर 2020 पर्यंत खातेदारांना पैसे न काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आतापर्यंत 35 हून अधिक खातेदारांनी आत्महत्या केल्याचे देखील या याचिकेत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, सध्या कोरोनाच्या काळात अनेक खातेदारांवर वैद्यकीय आपत्तकालीन परिस्थिती आलेली आहे. त्यामुळे खातेदारांना खात्यातून 5 लाख रुपये काढण्याची मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी न्यायालयाने केंद्र सरकार, आरबीआय आणि पीएमसी बँकेला  सूचना करण्याची मागणी या याचिकेत केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या