टॉस करून प्रोफेसरची नियुक्ती, पंजाबच्या मंत्र्याकडून उमेदवारांची टिंगल

32

सामना ऑनलाईन । चंदीगढ

हिंदुस्थानमधील शिक्षण व्यवस्था कशी आहे हे अनेक वेळा समोर आलं आहे मात्र पंजाबमध्ये शिक्षण व्यवस्थेचे वाभाडे काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रोफेसरच्या भरतीदरम्यान पंजाबचे मंत्री उमेदवारांच्या योग्यतेची टिंगल-टवाळी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये प्रोफेसरच्या नियुक्तीसाठी पंजाबचे मंत्री चरणजीत सिंह चन्नी टॉस करताना दिसत आहेत. टॉस जो जिंकेल त्याची प्रोफेसर म्हणून नियुक्ती करण्यात येईल. चन्नी यांचा हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत असून त्यांच्यावर टिकेची झोड उठत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये पंजाबचे मंत्री त्यांच्या कार्यालयामध्ये बसल्याचे दिसत असून त्यांच्या आजूबाजूला कर्मचारी आणि काही तरुण उभे असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये उभे असलेले तरुण प्रोफेसर पदाचे उमेदवार आहेत. उमेदवारांच्या नियुक्तीसाठी मंत्री उमेदवारांना छापा की काटा असे विचारत टॉस करताना दिसत आहेत आणि जो टॉस जिंकेल त्याची प्रोफेसर म्हणून नियुक्ती असा या मंत्र्याचा खेळ सुरू आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंजाब सरकारची सर्वत्र नाचक्की सुरू आहे. सोशल मीडियावरही नागरिकांना टीका केली आहे. विरोधी पक्ष अकाली दलने सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांच्या या खेळामुळे शिक्षण व्यवस्थेचा खेळ होत असल्याचं म्हटलं आहे. तसंच सरकारने या मंत्र्याबाबत योग्य निर्णय घ्यावा किंवा त्यांच्या भविष्याबाबत टॉस करावा असा टोला हाणला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या