पंतप्रधानांचा ताफा का अडला ? पंजाब सरकारने केंद्रीय गृहमंत्रालयाला अहवाल सोपवला

पंजाब सरकारने केंद्रीय गृह विभागाला आपला अहवाल सादर केला आहे. पंजाबमधील फिरोजपूर येथे सभेसाठी जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा एका पुलावर जवळपास 20 मिनिटं खोळंबून होता. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही एक मोठी त्रुटी असून त्या दिवशी नेमकं काय झालं होतं, याचं उत्तर पंजाब सरकारकडून मागवण्यात आलं होतं. हा अहवाल गुरुवारी रात्रीच केंद्रीय गृह विभागाला सोपवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हिंदी वृत्तवाहिनी अजतकने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

पंजाबचे मुख्य सचिव अनिरुद्ध तिवारी यांनी हा अहवाल सोपवला असून यामध्ये त्या दिवशी काय घटना घडल्या होत्या याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली होती, अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. आजतकने दिलेल्या वृत्तात म्हटलंय की पंजाबमध्ये ठिकठिकाणी होत असलेली विरोधप्रदर्शने पाहून पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बल तैनात करण्यात आलं होतं.

‘पंतप्रधानांचा ताफा’ सुप्रीम कोर्टात, आज सुनावणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पंजाबच्या अतिसंवेदनशील भागात 20 मिनिटे खोळंबल्याचे प्रकरण गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी याबाबत थेट सरन्यायाधीशांपुढे याचिका दाखल केली आहे. त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. दुसरीकडे केंद्रीय गृह मंत्रालय आणि पंजाब सरकारने या घटनेच्या चौकशीसाठी स्वतंत्र समित्या नेमल्या आहेत.

पंतप्रधान मोदी हे बुधवारी फिरोजपूरच्या प्रचारसभेसाठी रस्तेमार्गाने चालले होते. मात्र शेतकरी आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखल्यामुळे मोदींच्या ताफ्याला माघारी परतावे लागले. ही सुरक्षेतील गंभीर त्रुटी असून याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करीत ऍड. मनिंदर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. भविष्यात अशा प्रकारची घटना घडता कामा नये. प्रोटोकॉलनुसार पंतप्रधानांच्या दौऱयादरम्यान त्यांच्या ताफ्यात मुख्य सचिव, डीजीपी वा त्यांच्या प्रतिनिधींच्या कार असल्या पाहिजेत. मोदींच्या पंजाब दौऱयात तेथील मुख्य सचिव किंवा डीजीपी यापैकी कुणी नव्हते, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. याप्रकरणी शुक्रवारी सरन्यायाधीश रमण्णा यांच्या नेतृत्वाखाली न्यायमूर्ती सूर्या कांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे.

याचिकेत काय म्हटलेय?

  • मोदींचा ताफा रोखण्यास कारणीभूत ठरलेल्या सुरक्षा त्रुटींची सखोल चौकशी व्हावी आणि जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी.
  • पंजाबच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांनी रस्ता मोकळा असल्याचे विशेष सुरक्षा समूहाला कळवले होते. पण प्रत्यक्षात रस्त्यावर आंदोलक होते.
  • पोलिसांच्या मिलिभगतमुळे सुरक्षेचा बोजवारा उडाला.
  • पंजाब सरकार आणि तेथील पोलीस पंतप्रधानांना चोख सुरक्षा पुरवण्यास पूर्णतः अपयशी ठरले.

देशभर पडसाद

  • पंजाबमध्ये भाजपच्या नेत्यांनी तेथील राज्यपालांची भेट घेतली आणि पंजाबच्या गृहमंत्री व डीजीपी यांना बडतर्फ करण्याची मागणी केली.
  • मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या टिळक भवनवर मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले
  • महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधानांच्या दीर्घायुष्यासाठी मुंबादेवी मंदिरात प्रार्थना केली.
  • नागपुरात भाजप युवा मोर्चाने पंजाब सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी पोलीस व आंदोलकांमध्ये झटापट झाली.

मोदी राष्ट्रपतींच्या भेटीला; उपराष्ट्रपतींशीही चर्चा

केंद्र आणि पंजाब सरकारने सुरक्षा त्रुटींची चौकशी सुरू केली असतानाच राष्ट्रपतींनी पंजाबमध्ये घडलेल्या सुरक्षेसंबंधी त्रुटींची माहिती पंतप्रधानांकडून घेतली. यावेळी राष्ट्रपतींनी सुरक्षेच्या त्रुटीबाबत चिंता व्यक्त केली, असे ट्विट राष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आले. दोघांच्या भेटीचे फोटोही पोस्ट केले गेले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही मोदींशी चर्चा केली.