खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगचे साथिदार पोलिसांच्या ताब्यात, पंजाबमध्ये हाय अलर्ट; इंटरनेट सेवा बंद

खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा (Waris Punjab De) प्रमुख अमृतपाल सिंग (Amritpal Singh) याच्या समर्थकांना पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पंजाबमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.

पोलिसांनी अमृतपाल सिंग याच्या सहा साथिदारांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून हत्यारं आणि दोन गाड्याही जप्त केल्या आहेत. या कारवाईदरम्यान अमृतपाल सिंग पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके रवाना केली आहेत.

दरम्यान, या कारवाईनंतर पंजाब सरकारने एक निवेदन दिले आहे. यात सार्वजनिक हितांचे संरक्षण करण्यासाठी पंजाबमधील इंटरनेट सेवा, एसएमस सेवा (बँकिंग आणि मोबाईल रिचार्ज सोडून) आणि व्हाईस कॉल सेवा 18 मार्च ते 19 मार्च पर्यंत बंद करण्यात आल्या आहेत.