गुप्तांगात मिनी मोबाईल लपवून कैद्यांचा तुरुंगात खंडणी आणि अमली पदार्थांचा धंदा !

खंडणी आणि अमली पदार्थांचा अवैध धंदा तुरुंगात करता यावा याकरिता कैद्यांनी एक वेगळीच युक्ती शोधून काढली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना चकवा देऊन न्यायालयाच्या आवारात लिंकवरून मोबाईल खरेदी करण्याचे कैद्यांचे हे कृत्य तरुंग कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

पंजाब तुरुंगातील कैद्यांनी तस्करीचा एक वेगळाच मार्ग शोधून काढला आहे. यातील 70 टक्के फोन ‘केचोडा मोबाइल’ या चिनी कंपनीचे आहेत. गेल्या 6 महिन्यांत कारागृहातून सुमारे 4 हजार मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. तुरुंग अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कैदी आणि दहशतवादी गुंड हे फोन त्यांच्या गुप्तांगात लपवून ठेवतात आणि त्यांच्या माध्यमातून कारागृहातून खंडणी आणि अमली पदार्थांची तस्करी करण्याचा व्यवसाय चालवतात. या फोनची लांबी 7 सेमीपेक्षा कमी आहे आणि त्याची रुंदी 3 सेमी आहे. त्याचे वजन फक्त 22 ग्रॅम असून हा मोबाईल बाजारात 1,000 रुपयांपेक्षा कमी किमतीला विकत मिळतो. फोन ई-कॉमर्स साइटवरदेखील उपलब्ध आहेत.

याबाबत लुधियाना सेंट्रल तुरुंगाचे अधीक्षक शिवराज सिंह नंदगढ यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मिनी मोबाईल फोन आकाराने इतके लहान आहेत की, तुरुंगातील कर्मचार्‍यांनी अचानक केलेल्या तपासणीत कैदी हे मोबाईल भिंतींच्या फटींमध्ये लपवतात. लुधियाना मध्यवर्ती कारागृहात सुमारे 4 हजार कैदी आहेत. लुधियाना मध्यवर्ती कारागृहातील सरासरी 400 कैदी त्यांच्या खटल्यांच्या सुनावणीसाठी दररोज न्यायालयात येतात. काही कैदी पोलीस कर्मचाऱ्यांना चकवा देऊन न्यायालयाच्या आवारात त्यांच्या लिंकवरून मोबाईल खरेदी करतात. यानंतर कैदी मिनी मोबाईल फोन त्यांच्या गुप्तांगात लपवतात. कैद्यांचे साथीदार बाहेरून कारागृहाच्या भिंतींवर पॅकेट टाकत असत, हा तुरुंगात तस्करीचा आणखी एक मार्ग आहे. हे रोखण्यासाठी त्यांनी कारागृहाभोवती दक्षता वाढवली आहे. तुरुंग अधिकारी कैद्यांकडून मोबाईल फोन जप्त करण्यासाठी जवळपास दररोज अचानक छापे टाकत आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मोबाईल फोन सापडल्यास तुरुंग कायद्याच्या कलम 52A(1) अंतर्गत एफआयआर नोंदवला जातो. हे कलम जामीनपात्र असल्याने कारागृहातच कैद्याला जामीन मिळतो. यावर अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ते कैद्याची चौकशी करू शकत नाहीत. फोनची तस्करी करण्यासाठी कैद्यांनी जी पद्धत वापरत आहेत, ती अतिशय गूढ आहे. कैद्यांनी वापरलेले सिमकार्ड बनावट ओळखपत्र वापरून खरेदी केले असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

यापूर्वी, पंजाबचे तुरुंग मंत्री हरजोत सिंग बैंस यांनी यावर्षी ऑक्टोबरमध्ये अमृतसर कारागृहाला अचानक भेट दिली होती. तेव्हा त्यांनी लवकरच तुरुंगांमध्ये मोबाईल नेटवर्क जाम करण्यासाठी रेडियो फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. मोबाईल नेटवर्क ठप्प करण्याचे हे जगातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान असून कारागृहातून मोबाईलचा वापर पूर्णपणे बंद होणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करणारे पंजाब हे देशातील पहिले राज्य असेल, असे बैन्स यांनी सांगितले.