बापरे! वडिलांच्या उपचारासाठी साठवलेले 16 लाख पबजीवर उडवले

913

पबजी या ऑनलाईन गेमचे व्यसन दिवसेंदिवस तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. पबजीमुळे आत्महत्या केल्याच्या, मानसिक संतुलन बिघडल्याचे वृत्त बऱ्याचदा समोर आलेले असतानाही या खेळाचे व्यसन कमी होताना दिसत नाहीए. नुकतंच एका तरुणाने त्याच्या वडिलांच्या उपचारासाठी ठेवलेले 16 ला रुपये पबजीवर उडवल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. पंजाबमधील खागर येथे हा प्रकार समोर आला आहे.

सदर तरुण ऑनलाईन अभ्यासाच्या नावाखाली दिवसभर मोबाईलवर पबजी खेळत बसायचा. अकरावीला असलेला या तरुणाने ऑनलाईन स्टडी मटेरियल मागण्याच्या बहाण्याने वडिलांचे एटीएम कार्ड घेतले होते. मात्र तो त्याचा वापर करून पबजी खेळण्यासाठी लागणारे ऑनलाईन साहित्य खरेदी करायचा. ते खेरदी केल्यावर वडिलांच्या मोबाईलवर जाणारा मेसेजही तो डिलीट करायचा. त्याने गेल्या महिनाभरात वडिलांच्या तसेच आईच्या दोघांच्याही खात्यातून तब्बल सोळा लाख रुपये खर्च केले होते. ते सर्व पैसे त्या तरुणाच्या वडिलांच्या शस्त्रक्रीयेसाठी जमा केलेले होते. त्याने फक्त वडिलांच्या नाही तर आईच्या खात्यातून तसेच त्याच्या शिक्षणासाठी ठेवलेल्या पैशातूनही त्याने हा वायफळ खर्च केला होता.

आई वडिलांना जेव्हा त्याच्या या कारनाम्याविषयी समजले तेव्हा त्यांना धक्काच बसला आहे. त्यांनी मुलाच्या हातातून मोबाईल काढून घेतला असून त्याला एका मेकॅनिककडे कामाला लावले आहे. मात्र आता मुलाने केलेल्या या चुकीमुळे वडिलांच्या उपचारासाठी पैसे कुठून आणायचे असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. ‘मी मोबाईल त्याच्या हातात देऊन खूप मोठी चूक केली आहे. गेल्या काही वर्षांपासून काटकसर करून ठेवलेले पैसे त्याने एका झटक्यात उडवले. आता मी माझी शस्त्रक्रीया देखील करू शकत नाही. आता मी त्याला अभ्यासासाठी देखील मोबाईल हातात देणार नाही. त्याला पैशांची किंमत कळावी म्हणून त्याला मेकॅनिककडे कामाला लावले असल्याचे त्या तरुणाचे वडिल सफदार सिंग यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या