शास्त्रज्ञांच्या यादीत ब्रेकींग बॅडच्या अभिनेत्याचा फोटो, पंजाबमधील शाळेतला प्रकार

पंजाबमधली एक शाळा सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय बनली आहे. या शाळेतला एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. शाळेतल्या एका वर्गामध्ये विविध शास्त्रज्ञांचे फोटो लावण्यात आले आहेत. देशभरातील असंख्य शाळांमध्ये शास्त्रज्ञांचे फोटो किंवा चित्रे भिंतीवर लावलेली असतात. मग या शाळेतला व्हिडीओ व्हायरल का झाला असावा असा अनेकांना प्रश्न पडला आहे. व्हिडीओ नीट पाहिल्यास आपल्याला दिसेल की शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये वर्नर हायजेनबर्ग या प्रख्यात शास्त्रज्ञाचेही नाव आहे. मात्र त्यांच्या फोटोच्या जागी ब्रेकींग बॅडमध्ये काम करणाऱ्या ब्रायन क्रॅनस्टन याचा फोटो लावण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये वर्गातल्या भिंतीवर अल्बर्ट आईनस्टाईन, निकोला टेस्ला, यांचे फोटो लावण्यात आले आहे. या शास्त्रज्ञांच्या रांगेत नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध झालेल्या आणि बऱ्याच गाजलेल्या ब्रेकींग बॅड या मालिकेतील ब्रायन क्रॅनस्टन याचा फोटो लावण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या शिल्पा हिने म्हटलंय की ब्रायन याचा फोटो बऱ्याच ठिकाणी वितरीत करण्यात आला असून अशाच प्रकार आंध्र प्रदेशच्या शाळेमध्येही पाहायला मिळाला होता. हा व्हिडीओ जवळपास 13 लाख लोकांनी पाहिला असून त्यावर तऱ्हेतऱ्हेच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केलं असून यामुळे शाळेतील शिक्षणाचा दर्जा काय असेल हे दिसून येतं असं काहींनी म्हटलं आहे. ट्विटर वापरणाऱ्या आणकी एकाने ट्विट करत अशीच एक चूक निदर्शनास आणून दिली आहे. अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांच्या यादीमध्ये फोर्ड हॅरीस यांचेही नाव आहे. मात्र त्यांचा फोटो पाहिला तर तो हॉलीवूड अभिनेता हॅरीसन फोर्ड याचा लावण्यात आलेला आहे.