अर्थमंत्र्यांनी पुणेकरांच्या तोंडाला पाने पुसली

17

सामना प्रतिनिधी । पुणे

राज्याच्या अर्थसंकल्पात पुणे आणि नागपूर मेट्रोसाठी अवघी ९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त पुण्यासाठी कोणत्याही ठोस निधीची बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पात पुणेकरांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली असून, बजेटमध्ये पुणे ‘उणे’ राहिले आहे.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये पुणे आणि नागपूर मेट्रोसाठी अवघी ९० कोटींची तरतूद केली आहे. याशिवाय पीएमआरडीएमार्फत होणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर या २३ कि. मी. अंतराच्या ८ हजार ३१३ कोटी रुपये खर्चाच्या मेट्रो मार्गाचा उल्लेख अर्थमंत्र्यांनी भाषणात करताना या प्रकल्पाकरिता वेंâद्राने १३०० कोटी व्यवहार्यता तफावत निधी देण्यास सहमती दाखविल्याचा उल्लेख केला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसह स्मार्ट सिटी अभियानात असणाऱ्या ८ शहरांसाठी एकूण १ हजार ३१६ कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित केला आहे. हे वगळता पुणे अर्थसंकल्पात उणे राहिले आहे.

पुणे शहरातून राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात कर मिळतो. मात्र, पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. पुणेकरांनी भाजपचे एक खासदार आणि आठ आमदार निवडून दिले आहेत. तरीही बजेटमध्ये पुण्यासाठी अत्यंत तुटपुंजी तरतूद केली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत.

लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक

क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे प्रेरणादायी कार्य लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी पुण्यात लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक तयार करण्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र अर्थसंकल्पातून थोडा दूरच आहे. कोणतीही नवी योजना किंवा प्रकल्पाची घोषणा यावेळी करण्यात आलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या