सोज्वळ सात्त्विक

323

शेफ मेघना लिमये, [email protected]

श्रावणातल्या पदार्थांना एक वेगळीच चव असते. त्या चवीला सात्विकतेचा सोज्वळतेचा सुंदर सुवास असतो…

मराठी महिन्यांतील पाचवा महिना श्रावण असून सण-उत्सवांची सुरुवात करणारा आहे. आषाढी अमावास्या संपली की, यानिमित्त तयार होणाऱया पदार्थांची लोक आवर्जून वाटच बघत असतात. नारळीपौर्णिमेनिमित्त नारळीभात, गोकुळाष्टमीसाठी तयार केलेला दही-पोह्यांचा काला, मंगळागौरीनिमित्त वेगवेगळे पदार्थ, श्रावणातले हळदीकुंकू, सत्यनारायण पूजा, भोंडला, जिवती पूजन असा सवाष्ण महिलांकरिता भरगच्च कार्यक्रम या दिवसांत असतो. त्यानिमित्त काही वैशिष्टय़पूर्ण पदार्थांची चव चाखायला मिळते.

श्रावण महिना व्रतवैकल्यांचा असल्याने या दिवसांत उपवासांच्या पदार्थांबरोबरच बिनउपवासाच्या पदार्थांचीही रेलचेल असते. श्रावणात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी उकडलेले पदार्थ करण्याची प्रथा आहे. या दिवशी उकडीच्या शेंगा, दिंड किंवा पात्या केल्या जातात. शेंगेला छानशी मुरड घातली जाते. हे शेंगेचं वैशिष्टय़. यासोबत बिरडं, अळू आणि फरसबीच्या भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर येणाऱया शीतला सप्तमीला ‘सांदणी’ हा पदार्थ केला जातो. याशिवाय दर शुक्रवारी देवीला चणे, गूळ, दुधाचा नैवेद्य असतोच. असा विविध चवींचा श्रावण प्रत्येक जण  आपल्या पारंपरिक प्रथा, कुलाचाराप्रमाणे साजरा करत असतो.

शेंगदाण्याचे लाडू, राजगिऱयाचे लाडू, सकाळी उपवासाच्या मेन्यूमध्ये राजगिरा पुरी, उपवासाचं थालीपीठ, उपवासाची बटाटा भाजी, शिंगाडय़ाच्या पिठाचा शिरा, उपवास भाजणीचं थालीपीठ, साबुदाणा वडा अशी उपवासाच्या पदार्थांची तयारी करता येते. हे पदार्थ साजूक तुपात केले तर त्याची लज्जत काही न्यारीच असते. उपवासाच्या पदार्थांमध्ये कंदमूळ, बटाटा असे पदार्थही खाता येतात. उपवास सोडण्यासाठी साग्रसंगीत बनवलेल्या स्वयंपाकात कोथींबीर वडी, अळूवडी, श्रीखंड, गवलाईची खीर,आम्रखंड असा पूर्ण आहार घेतला जातो.

दर सोमवारी शिवाला शिवा शिवा महादेवा असे म्हणत शिवामूठ वाहिली जाते. लघुरुद्र केले जातात. यावेळी गुरुजींना साबुदाणा खिचडी, आटवलेलं दूध असा आहार देता येतो. मंगळागौरीला सवाष्ण स्त्रीया खेळ खेळतात. त्यांच्यासाठी पुरणपोळी, कटाची आमटी असा स्वयंपाक करतात. नागपंचमीला पुरणाचे दिंड हा गोडाचा पदार्थ बनवतात. ही खूप सुंदर रेसिपी आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी नारळी भाताबरोबर नारळाच्या वडय़ाही केल्या जातात. या वडय़ांमध्ये आंब्याचा रस किंवा आवडीप्रमाणे बनवू शकता. श्रावणसरी हलक्या असतात. पारंपरिकतेनुसार जपल्या जाणाऱया श्रावण महिन्यात तयार केल्या जाणाऱया पदार्थांची लज्जत दरवर्षी आपण नव्यानेच अनुभवत असतो, असे वाटते.

पुरणाचं दिंड…पुरण – एक वाटी चणा डाळ, एक वाटी गूळ, 3-4चमचे साखर किंवा अर्धा गूळ, अर्धी साखर वापरूनही पुरण करू शकता. देशावर फक्त साखरेचे दिंड केले जातात. कुकरला डाळ थोडी हळद घालून शिजवून घ्यायची. नंतर त्यातील पाणी काढून त्यामध्ये गूळ, ज़ायफळ पूड घालून पुरण पुन्हा शिजवून घ्यायची. त्यानंतर ते वाटायचं.

दिंडासाठी – मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरू शकता. २ वाटी गव्हाचं पीठ चाळून त्यात १ चमचा तेलाचं मोहन आणि चवीनुसार मीठ घालून घट्टसर मळून घेणे. १५ मिनिटे झ़ाकून मुरण्याकरिता ठेवावी.

कृती – मळलेल्या कणिकेचा गोळा घेऊन त्याची पातळ पुरी लाटावी. त्यामध्ये पुरण भरावं आणि ते चौकोनी आकारात बंद करावं. मोदकपात्र असेल तर त्यामध्ये किंवा एका मोठय़ा पातेल्यात पाणी गरम करत ठेवावे. त्यावर बसणारी चाळण ठेवून त्यावर सुती कापड घालावे. तयार केलेले दिंड त्यावर वाफवण्यासाठी ठेवावे. मोदकाप्रमाणे १५ ते २० मिनिटे वाफवून घ्यावेत. गरमागरम दिंडाचा नागपंचमीच्या दिवशी नैवेद्य दाखवावा.

पेरूचं पंचामृत...साहित्य – २ वाटय़ा पेरूचे तुकडे,२ हिरव्या मिरच्या, तेल, हिंग, मोहरी, मीठ, हळद, मेथीदाणा, दाण्याचं कूट, किसलेला गूळ

कृती पेरू धुऊन त्याच्या बिया काढून त्याचे तुकडे करायचे. तेलाऐवजी आवडीप्रमाणे तूपही वापरू शकता. तेल तापले की, मेथीदाणा फोडणीला घालायचा. नंतर त्यावर मोहरी, हिंग, हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. थोडं परतवलं की, नंतर पेरूचे तुकडे घालायचे. वाफ येऊ द्यायची. शेंगदाण्याचं कूट घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. थोडं जाडसर झालं की, पातेलं उतरवायचं.

अळूवडी…साहित्य अळूची ८-१० कोवळी पाने, बेसन पीठ २ वाटय़ा, हिरव्या मिरच्या ७-८ लसूण पाकळ्या ७-८, जीरे / (जिरेपूड) १ छोटा चमचा, गूळ १ छोटा चमचा, चिंचेचा कोळ १ चमचा, मीठ चवीनुसार, तळण्यासाठी तेल, भाजलेली बडीशेप भरड अर्धा चमचा (आवडीनुसार).

कृती प्रथम अळूची पाने स्वच्छ धुऊन पुसून कोरडी करून घ्या. अळूच्या पानाच्या मागच्या बाजूला असलेला देठ कापून घ्या. आता हिरव्या मिरच्या आणि लसूण यांचं वाटण करून घ्या. एका भांडय़ामध्ये वरील सर्व साहित्य एकत्रित करून घ्या. मिश्रण जास्त पातळ नको, जास्त घट्ट नको. मध्यम ठेवा. आता एक पान घ्या. ज्या बाजूला शिरा असतात त्या बाजूला वरील मिश्रण सगळीकडे एकसारखे पसरवून घ्या. त्यावर पुन्हा एक पान ठेवा. असे कमीतकमी ३-४ पानांच्या थराला व्यवस्थित मिश्रण लावून घ्या. नंतर या पानांची अलगद गुंडाळी करा. एका चाळणीत हे रोल वाफवायला ठेवा. एक पातेले घ्या. त्यात पाणी गरम करून घ्या त्यावर चाळणी ठेवून वरून एक घट्ट झाकण ठेवा. साधारण १०-१५ मिनिटे वडय़ा उकडून घ्या

सुरी खुपसून पहा. जर सुरीला बेसन लागले नाही तर वडी शिजली असे समजा. आता या उकडलेल्या वड़य़ा थोडय़ा थंड होऊ द्या. नंतर वडय़ांचे गोल काप करून अळुवडय़ा कुरकुरीत किंवा हव्या तशा तळून घ्या.

 

आपली प्रतिक्रिया द्या