एटीएमची अदला बदल करून खात्यातून सव्वा लाख उडवले, पूर्णा शहरातील प्रकार

प्रातिनिधिक फोटो

शहरातील आडत दुकानामध्ये मुनिम म्हणून कार्यरत असलेल्या एका इसमाची मंगळवार रोजी अज्ञात भामट्यांनी फसवणूक केली. पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेले असता हातचलाखीने एटीएमची अदलाबदल करून फिर्यादीच्या खात्यातील 1 लाख 20 हजार रुपये परस्पर उचलले. याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तालुक्यातील सुहागन येथील मारोती तुकाराम भोसले हा शहरातील एका दुकानावर मुनिम म्हणून कार्यरत आहे. 2 मार्च रोजी आई आजारी असल्यामुळे त्यांनी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रावर जाऊन पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या पाठीमागे उभ्या भामट्याने तुमच्या एटीएममध्ये बिघाड आहे. मी बरोबर करून देतो, म्हणून हातचलाखीने एटीएम कार्ड ताब्यात घेतले. यानंतर स्वतःचे एटीएम मारुती भोसले यांनी दिले.

पैसे निघत असल्यामुळे मारुती भोसले हा एटीएम मधून निघून गेला, परंतु सदर भामट्याने मारुती भोसले यांच्या एटीएमचा गैरवापर करून पूर्णा शहरासह आनंद नगर चौक येथे दुपारी 3 वाजता 20 हजार रुपये, नांदेड येथील पेट्रोल पंपावर 20 हजार रुपये, नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे 20 हजार रुपये, गंगाखेड येथे 20 हजार रुपये, लातूर येथे 20 हजार रुपये असे एकूण 1 लाख 20 हजार रुपये काढले.

झालेला प्रकार लक्षात येताच भोसले यांनी पूर्णा पोलीस ठाण्याचे सपोनी भागोजी चोरमले व पोऊनि माणिक गुट्टे यांना सांगितला. यानंतर भोसले ते खाते स्थगित करण्यात आले. भोसले यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि भागोजी चोरमले, माणिकराव गुट्टे करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या