चोरलेली पर्स ‘ती’ जपून ठेवायची,पाकीट मारणाऱया महिलेचा हटके छंद

38

आशिष बनसोडे  ,मुंबई

पाकीट चोरल्यानंतर त्यातील रोकड आणि एटीएम कार्ड काढून ते पाकीट फेकून दिले जाते. जवळपास सर्वच चोर असेच करतात, पण शाहूनगर पोलिसांनी अटक केलेली महिला चोर त्याला अपवाद ठरली आहे. ती क्षणात पर्स चोरते, पण चोरीची पर्स अथवा पाकीट फेकून न देता घरात जपून ठेवते. उपयोग नसतानाही चोरीचा मुद्देमाल जपून ठेवायचा हटके छंद असलेल्या त्या महिलेच्या घरावर पोलिसांनी छापा मारला तेव्हा तब्बल २०० पर्स तेथे सापडल्या. शिवाय शेकडो पॅन, आधार, एटीएम कार्डदेखील हाती लागले.

सौफिया इरफान शेख (२४) असे त्या पाकीटमार महिलेचे नाव आहे. १० एप्रिलच्या सकाळी बेस्ट बसने प्रवास करणाऱया संजय कुंचीकुरवे यांचे पाकीट चोरीला गेले होते. त्यानंतर तासाभरात शीव, घाटकोपर आणि मानखुर्द येथील आठ एटीएम सेंटरमधून कुंचीकुरवे यांच्या एटीएम कार्डवरून ४९ हजार काढण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी शाहूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप थोरात, पोलीस निरीक्षक सुशील इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुकाराम डिगे, सागर भोकरे, अंमलदार प्रकाश भोसले, लामगे, प्रकाश गिराम, संजय भिलारे, मोहसीन पठाण आणि सहदेव पडवळ या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. मानखुर्दच्या चिकुवाडीत राहणारी सौफिया हिनेच कुंंचीकुरवे यांचे पाकीट मारल्याचे स्पष्ट होताच डिगे व त्यांच्या पथकाने सौफियाच्या घरावर छापा टाकला.

एटीएम, आधार, पॅनकार्डचा साठा

सौफियाच्या घराची झडती घेतल्यावर पोलीसही अवाक् झाले. कारण तिने चोरलेल्या २०० पर्स घरात व्यवस्थित ठेवलेल्या सापडल्या. इतकेच नाही तर ९६ एटीएम कार्ड,  ५२ आधार कार्ड,  ४५ पॅनकार्ड,  २१ उमेदवारी कार्ड,  ५६ शॉपिंग कार्ड,  २३ बस पासेस,  १३ परवाने,  ९ रेल्वे पासेस,  ४६ ओळखपत्र,  ७ पासबुक असा साठाच सापडला.

 जुगार आणि दारूसाठी

दादर ते चेंबूर या मार्गावर धावणाऱया बेस्ट बसमध्ये सौफिया पाकीटमारी करते. सकाळी दादरच्या फुलमार्केट येथे हातसफाई केल्यानंतर ९ ते १० च्या सुमारास प्रवाशांनी भरून धावणाऱया बसेसमध्ये ती चोऱया करते. सौफियाला जुगार आणि दारूचे व्यसन आहे. हे व्यसन पूर्ण करण्यासाठी ती चोऱया करते.

 आमच्याशी संपर्क साधा

सौफियाने शेकडो नागरिकांचे पर्स, पाकिटे चोरली आहेत. अनेकांची रोकड वापरली तर ज्यांच्या एटीएम कार्डवर पिनकोड होता त्या कार्डचा वापर करून पैसे काढले. शिवाय अनेकांचे पॅन, आधार, उमेदवारी कार्ड, ओळखपत्र तिच्या घरी सापडले आहेत. त्यामुळे दादर परिसरात किंवा दादर ते चेंबूर बेस्ट बसने प्रवास करताना ज्यांचे पाकीट चोरले असेल त्यांनी शाहूनगर पोलीस ठाण्याशी संपर्प साधा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या