पुरुषोत्तम पाटील

<< प्रशांत गौतम >>

धुळे येथील व्यासंगी कवी आणि साक्षेपी संपादक पुरुषोत्तम पाटील म्हणजेच पुपाजी गेले. त्यांच्या निधनाने मराठी कवितेचा चार दशकांचा सहप्रवासी हरपला आहे. १९७८ साली ‘अनुष्ठभ’ नियतकालिकांचे संपादन केल्यानंतर त्यांनी १९८५ च्या सुमारास खास कवितेसाठी ‘कवितारती’ हे त्रैमासिक सुरू केले. मराठी वाङ्मयीन नियतकालिकांचा दर्जा उंचावण्यास ज्या मासिकांचे योगदान लाभले त्यात अनुष्ठभ आणि कवितारती यांचे मानाचे स्थान आहे. तळव्यातल्या साऊल्या, परिदान हे दोन कवितासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. निव्वळ कवितेसाठीच असलेले हे कवितारती केवळ वर्गणीदारांच्या, रसिकांच्या पाठबळावरच चालत असे. ख्यातनाम हिंदी कवी गुलजार हेही कवितारतीच्या प्रेमात पडले होते. पुपाजींना पत्र पाठवून वर्गणीदार हेण्याची इच्छा व्यक्त केली होती. यातच सर्व काही आले. ३ मार्च १९२८ साली जळगाव जिल्हा पारोळा तालुक्यात बहादरपूर येथे त्यांचा जन्म झाला. पुण्यात फर्ग्युसनमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच सत्यकथेसारख्या दबदबा असलेल्या वाङ्मयीन मासिकात त्यांच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. नंतर जळगावात वृत्तपत्रात काम करीत असताना जिल्हय़ात चिंचोली हातेड येथील शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्य केले. कला शाखेचे पदवीधर झाल्यानंतर धुळे येथे श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. वृत्तपत्रात पुपाजींनी ‘अमृताच्या ओळी’ आणि ‘तुकारामाची काठी’ हे सदर नुसते लिहिले नाही तर वाचकप्रियही केले. कारण अशा प्रकारच्या वाङ्मयीन सदर लेखनातून त्यांनी मराठी कवितांचे मर्म वाचक, जाणकार, अभ्यासकांना उलगडून सांगितले. महाविद्यालयात असतानाच त्यांना कवी बा.भ. बोरकर, वि.स. खांडेकर यांचे लेखनिक होण्याचे भाग्य लाभले. एवढेच नव्हे तर पुपाजींचे विंदा करंदीकर, रणजित देसाई, शांताबाई शेळके या ज्येष्ठ लेखकांसोबत उत्तम ऋणानुबंध होते आणि साक्षात कुसुमाग्रज तर त्यांचे प्रेरणास्थानच होते. मोठय़ा लेखकांशी नाते जोडत असतानाच ते नव्या पिढीतील प्रतिभावंत कवींचे मार्गदर्शक होते. अनुष्ठभचे साडेपाच वर्षे संपादन केल्यानंतर त्यांनी आपले लक्ष कवितारतीवर केंद्रित केले. वाङ्मयीन नियतकालिकांच्या पडझडीच्या काळात कवितारतीने आपले अस्तित्व, सातत्य परिश्रमपूर्वक जपले. पाटील यांच्या काव्यलेखनात र्सौदर्यलक्षी जाणिवांचा प्रत्यय असल्याने आणि द्वैमासिकाची जडणघडण ही त्याच काव्यधारेने घडली होती. नियतकालिकाचे संपादन करीत असताना त्यांनी संपादकासोबत कवीची भूमिका पार पाडली. आजपर्यंत प्रकाशित झालेल्या पंधरा विशेषांकांपैकी दहा विशेषांक हे कवी आणि त्यांचे काव्य यासंदर्भातच आहेत. बालकवी (२), कुसुमाग्रज (३), इंदिरा संत, वा.रा. कांत, बा.भ. बोरकर, बा.सी. मर्ढेकर आणि विंदा करंदीकर यांच्यावरील ते दर्जेदार विशेषांक आहेत. तसेच रा.ग. जाधव आणि म.सु. पाटील या काव्यसमीक्षकांच्या व्यक्तिमत्त्वाचा, समीक्षा लेखनाचा वेध घेणारे विशेषांकही पुपाजींनी प्रकाशित केले. १९९३ च्या सुमारास ‘काव्यचर्चा’ हा विशेषांक प्रकाशित झाला होता. त्यात कवितेसंबंधी निरनिराळ्या प्रश्नांबाबत मराठी कवितेची आजवरची आणि वर्तमानातील स्थिती याबाबत समीक्षेची चर्चा होती आणि कवितारतीच्या २०१२ च्या कविता मर्मग्रहण या विशेषांकात महाकवी कालिदास, संत नामदेव यांच्यासोबत बी. रघुनाथ, बा.भ. बोरकर, भालचंद्र नेमाडे, वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, अनुराधा पाटील, प्रफुल्ल शिलेदार, मीनाक्षी पाटील अशा भिन्न जाणिवांच्या कवितेवर चर्चा होती. कवितारतीमधून येणारी परीक्षणेही मराठी काव्य समीक्षेला सूक्ष्म दृष्टी प्राप्त करून देणारी होती. त्यामुळे प्रत्येक अंकात कविता आणि काव्य समीक्षा या दोन्हींसंबंधीचा व्यापक विचार आणि उदार दृष्टिकोन मांडलेला दिसतो. कवी आणि काव्यासंबंधी कवितारतीने काढलेले विशेषांक हे मराठी साहित्याच्या प्रवासात मार्गदर्शक, महत्त्वाचे ठरले. १९८५ नंतरच्या कितीतरी कवींसाठी, त्यांच्या कवितेसाठी पुपाजींचे कवितारती हे हक्काचे व्यासपीठ झाले होते. पाटील शिस्तप्रिय व भाषा, शुद्धलेखनाबाबतही आग्रही होते. कवितेमुळे विद्यार्थीप्रिय झाले व महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर मोठा मित्रपरिवार जमवला. पुरुषोत्तम पाटील साहित्य अकादमी, साहित्य महामंडळ, राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांचे सदस्य होते. त्यांच्या कवितासंग्रहासाठी राज्य पुरस्कार लाभला होता. तसेच राज्य साहित्य संस्कृती मंडळाने २००३  साली गौरवप्रती देऊन सन्मान केला होता. पुपाजींच्या निधनाने तीन पिढय़ांचा मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या