Pushpa Movie Allu Arjun – पुष्पा चित्रपट ओटीटीवर प्रसिद्ध

तेलुगू चित्रपट ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपटगृहांमध्ये झळकल्यानंतर तो OTT वरही प्रदर्शित करण्यात आला आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट डिसेंबर महिन्यात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती आणि त्याने स्पायडरमॅन चित्रपटालाही कमाईच्या बाबतीत मागे टाकलं होतं.

पुष्पा चित्रपट तामीळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारपर्यंत म्हणजेच 7 जानेवारीपर्यंत चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 72 कोटींची कमाई केली होती. हे आकडे ‘स्पायडरमॅन-नो वे होम’ आणि रणवीर सिंगच्या ’83’ या चित्रपटाच्या कमाईपेक्षा कितीतरी पट जास्त आहेत. जगभरात या चित्रपटाने 300 कोटींचा गल्ला कमावला असल्याचे या चित्रपटाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सांगण्यात आले आहे.

पुष्मा चित्रपट आता ओटीटीवरही प्रसिद्ध झाला असून तो Amazon Prime वर पाहायला मिळणार आहे. शुक्रवारी रात्री 8 वाजता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. मार्व्हल स्टुडिओच्या बहुचर्चित ‘स्पायडरमॅन-नो वे होम’ या हॉलीवूडपटाचे तगडे आव्हान असतानाही दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक ओपनिंग मिळवली होती. ‘स्पायडरमॅन’मुळे ‘पुष्पा’ला फटका बसेल अशा चर्चा सुरू होत्या. प्रत्यक्षात उलटेच चित्र बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळाले. ‘पुष्पा’ला 45 कोटी रुपयांची दमदार ओपनिंग मिळाली होती, या चित्रपटामुळे दुसऱ्या दिवशी ‘स्पायडरमॅन’च्या कलेक्शनमध्ये घट झाली होती.