लागेना डोळ्याशी डोळा, काय जाहले फुलराणीला? राष्ट्रीय शिबीर सोडून सिंधू गेली लंडनला

हिंदुस्थानच्या बॅडमिंटन या खेळामधून टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावण्याच्या आशांना मंगळवारी सुरूंग लागला आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावत इतिहास रचणारी पी व्ही सिंधू ही हैदराबाद येथील राष्ट्रीय शिबीर अर्धवट सोडून लंडनला गेली आहे. प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्याकडून माझ्या मुलीचा सराव योग्य प्रकारे करवून घेतला जात नव्हता, असे सिंधू हिचे वडील पी व्ही रमणा यांनी म्हटले आहे. पी. व्ही. सिंधू हिच्या वडिलांनी केलेल्या आरोपाबाबत प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांना विचारले असता ते म्हणाले, रमणा काय म्हणाले त्यावर मी काही बोलणार नाही. पण सिंधू काही म्हणाली तर नक्कीच बोलीन.

कुटुंब अन् गोपीचंद यांच्यासोबत कुठलाही वाद नाही – सिंधू

कौटुंबिक आणि प्रशिक्षक गोपीचंद यांच्यासोबत वाद सुरू असल्यामुळे पी. व्ही. सिंधू लंडनला रवाना झाली असल्याची बातमी हिंदुस्थानातील मीडियामधून समोर येऊ लागली. त्यानंतर पी. व्ही. सिंधू हिने सोशल साईटवर आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, माझ्या बॅडमिंटन करीअरसाठी कुटुंबियांना तडजोड करावी लागली आहे. त्यांच्यासोबत माझा वाद कसा काय होऊ शकतो. तसेच त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच मी लंडनला आले आहे. येथे आल्यानंतरही दररोज मी त्यांच्यासोबत संपर्कात आहे. प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्यासोबतही कुठलाही वाद नाहीए. तसेच अॅकॅडमीत मिळत असलेल्या सुविधांबाबतही कोणतीही तक्रार नाहीए, असेही ती पुढे म्हणाली. तसेच ज्या दैनिकामधून ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्याबाबतही तिने खडे बोल सुनावले आहे.

गॅटोरेड स्पोर्टस् सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग

पी. व्ही. सिंधू सध्या लंडनमधील गॅटोरेड स्पोर्टस् इन्स्टिट्यूटमध्ये न्यूट्रीशन व रिकव्हरीबाबत ट्रेनिंग घेत आहे. आणखी काही दिवस ती तेथेच राहणार आहे. त्यामुळे इंग्लंडच्या संघासोबतही ती बॅडमिंटनचा सराव करणार आहे. पी. व्ही. सिंधू हिने याबाबत बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया तसेच प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनाही पत्राद्वारे कळवले आहे.

सिंधू गॅटोरेड ट्रेनिंग अॅकॅडमीत न्यूट्रीशनबाबतच्या मार्गदर्शनासाठी गेली असून तेथे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटदेखील आहे. – गोपीचंद

आपली प्रतिक्रिया द्या