वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप; सिंधूचे पदक निश्चित, साईप्रणीतने रचला इतिहास

187

शटलक्वीन पी. व्ही. सिंधू आणि बी. साईप्रणीत या हिंदुस्थानच्या बॅडमिंटनपटूंनी कोर्टवर धडाकेबाज खेळ करीत जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधील एकेरीत उपांत्य फेरीत प्रवेश करून पदक पक्के केले. पी. व्ही. सिंधूने मानाच्या स्पर्धेतील पाचवे पदक पक्के केले असून दोन रौप्य व दोन कास्य पदक पटकावणाऱया हिंदुस्थानच्या या कन्येला आता सुवर्ण पदक पटकावण्याचा ध्यास लागला असेल. बी. साईप्रणीतने उपांत्य फेरीत प्रवेश करून हिंदुस्थानसाठी इतिहास रचला. प्रकाश पदुकोण यांच्यानंतर या स्पर्धेत पदक जिंकणारा तो हिंदुस्थानचा पहिलाच पुरुष खेळाडू ठरला आहे. प्रकाश पदुकोण यांनी 1983 साली कास्य पदक जिंकले होते.

पी. व्ही. सिंधूने चीन तैपेईच्या तेई यींग हिला 12-21, 23-21, 21-19 अशा फरकाने पराभूत केले. पहिला गेम 12-21 अशा फरकाने गमावल्यानंतर पी. व्ही. सिंधूने पुढील दोन्ही गेम जिंकले. ‘अर्जुन’ पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेल्या बी. साईप्रणीतने जॉनाथन ख्रिस्तीला 24-22, 21-14 असे हरवले.

आपली प्रतिक्रिया द्या