रशियन कच्च्या तेलाचा प्रश्न

ब्रिगेडियर हेमंत महाजन

पाश्चिमात्यांना सध्याच्या आर्थिक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी हिंदुस्थान स्वस्त शुद्ध तेलाचा मोठा निर्यातदार म्हणून पुढे येत आहे. हिंदुस्थानातून युरोपमध्ये होणाऱ्या डिझेल निर्यातीमध्ये 12 ते 16 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसते. प्रतिदिन दीड लाख बॅरलवरून 1 लाख 67 हजार बॅरलपर्यंत ही वाढ झाली आहे. एक-दोन देश सोडून बाकी युरोपचे देश हिंदुस्थानकडून मोठय़ा प्रमाणात रिफाइंड पेट्रोल आणि डिझेल विकत घेत आहेत. कारण ते त्यांना फायद्याचे आहे. म्हणून ते विरोधकांना फारसे महत्त्व देत नाहीत.

युरोपीय महासंघाचे परराष्ट्र धोरणप्रमुख जोसेफ बोरेल यांनी म्हटले की, हिंदुस्थान रशियाकडून घेत असलेले कच्चे तेल शुद्धीकरण करून पुन्हा युरोपला विकत आहे. त्यामुळे युरोपियन युनियनने हिंदुस्थानवर कारवाई करायला हवी. रशियावर निर्बंध लादलेले असताना त्यांचे तेल अशा मार्गाने युरोपमध्ये येत असेल तर त्याच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र हिंदुस्थानने बोरेल यांचा दावा फेटाळून लावताना रशियाकडून कच्चे तेल विकत घेण्याची कृती योग्य ठरविली आहे. लाखो लोक गरिबीत राहत असताना हिंदुस्थान्रची ऊर्जा क्षेत्राची भिस्त ही आयातीवर अवलंबून आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत अधिकची रक्कम खर्च करणे हिंदुस्थानला परवडणारे नाही, अशी भूमिका हिंदुस्थानने मांडली.

फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियाकडून कच्चे तेल विकत घेणारा हिंदुस्थान एक मोठा खरेदीदार म्हणून पुढे आला आहे. मागच्या आठवडय़ात आलेल्या बातमीनुसार, रशियातून कच्च्या तेलाची आयात गेल्या वर्षात 10 पटींनी वाढ झाली आहे. 2021 मध्ये हिंदुस्थानच्या वार्षिक आयातीमध्ये रशियाच्या कच्च्या तेलाचा वाटा फक्त दोन टक्के होता. आता हा आकडा 20-23 टक्क्यांवर गेला आहे.

याआधी हिंदुस्थान सौदी अरेबिया, इराण अशा देशांपासून तेल आयात करत होता, परंतु त्यांची किंमत जास्त होती. मात्र युक्रेन युद्धामुळे निर्बंध लावल्यामुळे रशियाने हिंदुस्थानला स्वस्त दरामध्ये कच्चे तेल निर्यात करण्याचा निर्णय घेतला. कारण त्यामुळे रशियाचा फायदा होत होता. सध्या परिस्थिती अशी आहे की, हिंदुस्थानला लागणाऱ्या कच्च्या तेलाच्या मागणीपेक्षा आपल्याला पुष्कळ जास्त कच्चे तेल रशियाकडून मिळत आहे. म्हणूनच हिंदुस्थानने देशाच्या गरजेपेक्षा जास्त मिळणाऱ्या कच्च्या तेलाचे शुद्धीकरण करून ते युरोप आणि इतर देशांना विकण्याचा निर्णय घेतला आहे, जो एक अतिशय चांगला आणि देशाकरिता फायदेशीर निर्णय आहे.

रशियाकडून आयात केलेल्या कच्च्या तेलावर प्रक्रिया करून ते पुन्हा पाश्चिमात्य देशांना विकल्यामुळे त्याचा त्या देशांनाच लाभ होत आहे. त्यामुळे हिंदुस्थानला अजून तरी या निर्णयाचा काहीही फटका बसलेला नाही. रशियाकडून स्वस्तात मिळणाऱ्या कच्च्या तेलावर प्रक्रिया करून युरोप आणि अमेरिकेत त्याची विक्रमी निर्यात केल्यामुळे हिंदुस्थानी तेलशुद्धीकरण कंपन्या नफा कमवत आहेत. ज्याचा फायदा देशाला होत आहे. या तेल कंपन्यांना होणाऱ्या प्रॉफिटवर विंडफॉल टॅक्स लावला जातो, ज्याचा देशाला प्रचंड फायदा होतो.त्यामुळे देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गेली दोन वर्षे स्थिर ठेवण्यात देशाला मदत मिळाली. जगभर तेलाची किंमत वाढत आहे, हिंदुस्थानात नाही.

रशियाने फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युरोप आणि पाश्चिमात्य देशांनी रशियातून होणाऱया ऊर्जा आयातीमध्ये कपात करून त्याच्यावरील अवलंबित्व कमी करण्यास सुरुवात केली. रशियाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देण्यासाठी पाश्चिमात्य देशांकडून हे करण्यात आले. जर्मनीने नैसर्गिक वायूच्या पाइपलाइनचा प्रस्ताव रद्द केला. कॅनडा आणि अमेरिकेने रशियातून आयात होणाऱया कच्च्या तेलावर निर्बंध लादले.

पाश्चिमात्य देशांनी रशियावरील निर्बंध आणखी कठोर करण्याचे प्रयत्न केले. 5 डिसेंबर 2022 रोजी ‘जी सेव्हन’ देश पॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स तसेच युरोपियन युनियन आणि ऑस्ट्रेलियाने रशियाच्या कच्च्या तेलावरील किमतीवर मर्यादा लादल्या. किमतीवर मर्यादा लादल्यामुळे पाश्चिमात्य शिपर्स आणि विमा पंपन्यांना रशियाने 60 डॉलर बॅलरपेक्षा अधिक किमतीत तेल विकल्यास त्या व्यापारात सहभाग घेता येत नाही.

रशियाचे तेल वाहून नेणारे अधिकतर ऑईल टँकर्स हे युरोपियन आहेत. तसेच वैश्विक विमा काढणाऱया 90 टक्के कंपन्या या युरोपियन कंपन्या आहेत. तज्ञांच्या अंदाजानुसार कच्च्या तेलाच्या किमतीवर मर्यादा लादल्यामुळे रशियाची अर्थव्यवस्था खिळखिळी होईल, त्याशिवाय युव्रेनविरोधातील लढाईला रसद पुरविण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा निधी उरणार नाही असा त्यांचा अंदाज होता, जो चुकीचा ठरला. पाश्चिमात्य देशांच्या या चालीवरदेखील रशियाने उपाय शोधून काढला आणि त्यांनी हिंदुस्थान आणि चीनमध्ये कच्च्या तेलाची निर्यात वाढविली.

रशियामधील कच्च्या तेलाच्या आयातीवरील प्रतिबंध हिंदुस्थानला लागू होत नाहीत. त्यामुळेच रशियातून आयात होणाऱया कच्च्या तेलाची आवक गेल्या वर्षभरात उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे हिंदुस्थानला देशांतर्गत इंधनाची गरज तर भागवता येत आहे. त्याशिवाय पाश्चिमात्य देशांनादेखील इंधन पुरवठा करता येणे शक्य झाले आहे. रशिया-युव्रेन युद्धानंतर अनेक पाश्चिमात्य देश इंधन तुटवडा सहन करत होते. अशा देशांना हिंदुस्थानने मदतीचा हात देऊ केला आहे. फेब्रुवारीच्या अहवालानुसार हिंदुस्थान रशियाकडून अधिक प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करत असून त्यावर प्रक्रिया केल्यानंतर युरोप आणि अमेरिकेत निर्यात करत आहे.

हिंदुस्थान रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल घेऊन ते युरोपला विकून नफा कमवत आहे तसेच रशियाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावत आहे ही युरोपमधे काही राजकारण्यांची मूळ पोटदुखी आहे, पण हेच युरोपियन देश जेव्हा स्वतः रशियाकडून खरेदी करतात, त्याचे त्यांना काही वाटत नाही.

पाश्चिमात्यांना सध्याच्या आर्थिक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी हिंदुस्थान स्वस्त शुद्ध तेलाचा मोठा निर्यातदार म्हणून पुढे येत आहे. हिंदुस्थानातून युरोपमध्ये होणाऱया डिझेल निर्यातीमध्ये 12 ते 16 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसते. प्रतिदिन दीड लाख बॅरलवरून 1 लाख 67 हजार बॅरलपर्यंत ही वाढ झाली आहे. एक-दोन देश सोडून बाकी युरोपचे देश हिंदुस्थानकडून मोठय़ा प्रमाणात रिफाइंड पेट्रोल आणि डिझेल विकत घेत आहेत. कारण ते त्यांना फायद्याचे आहे. म्हणून ते विरोधकांना फारसे महत्त्व देत नाहीत.

> [email protected]