नोटा बदलण्यासाठी आजपासून बँकांसमोर रांगा

दोन हजाराच्या नोटा बदलण्यासाठी उद्यापासून (दि. 23) बँकांसमोर रांगा लागतील. कडाक्याच्या उन्हात लोकांची गर्दी होणार असल्यामुळे बँकांनी शेड उभारावे, मंडप टाकावा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिल्या आहेत. दरम्यान, 2016 च्या नोटाबंदीवेळी लोकांचे प्रचंड हाल झाले होते. हे टाळण्यासाठी आरबीआयने बँकांना सूचना केल्या आहेत.

रिझर्व्ह बँकेने दोन दिवसांपूर्वी दोन हजाराची नोटाबंदीची घोषणा केली. 2 हजाराच्या नोटा चलनात कमी आहेत. तसेच या नोटा बदलण्यासाठी 23 मे ते 30 सप्टेंबर अशी चार महिन्यांची मुदत असली तरीही बँकांसमोर लोकांच्या रांगा लागतील असा अंदाज आहे. 2016च्या नोटाबंदीवेळी लोकांचे प्रचंड हाल झाले. तासन्तास बँकांच्या रांगेत लोक उभे होते. देशात 100 ते 150 जणांचा मृत्यू यादरम्यान झाला होता. 2016ची चूक यावेळी नको म्हणून रिझर्व्ह बँकेने एक परिपत्रक जारी करून बँकांना खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

आरबीआयच्या काय आहेत सूचना?

  • उन्हाची तीव्रता पाहता बँकांनी आपल्या आवारात शेड, मंडप उभारावा.
  • नोटा बदलण्यासाठी आलेल्या लोकांकरिता पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे.
  • गर्दी, गोंधळ होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

अर्थव्यवस्थेवर किरकोळ परिणाम गव्हर्नर दास

दोन हजाराची नोट बाजारातून माघारी घेतल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर अत्यंत किरकोळ परिणाम होईल, असा दावा आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केला आहे. चलनामध्ये ज्या नोटा आहेत त्यात केवळ 10.8 टक्के नोटा 2 हजाराच्या आहेत. 2 हजाराच्या नोटांचा वापरही लोक फार करत नाहीत. त्यामुळे याचा अर्थव्यवस्थेवर फार काही परिणाम होणार नाही. 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलण्याची मुदत आहे. चार महिने वेळ पुरेसा आहे, असे ते म्हणाले.

30 सप्टेंबरनंतर काय होणार?

2 हजाराची नोट ‘लिगल टेंडर’ म्हणजे कायदेशीरदृष्टय़ा वैध राहील असे आरबीआयने म्हटले आहे. त्यामुळे 30 सप्टेंबरनंतर 2 हजाराच्या नोटांचे काय होणार? चलनात राहणार का? याबाबत जनतेच्या मनात संभ्रम आहे. यावर पत्रकारांनी विचारले असता गव्हर्नर दास म्हणाले, 30 सप्टेंबरनंतर काय होणार हे मी आत्ताच सांगू शकत नाही, परंतु 30 सप्टेंबरपर्यंत चलनात असलेल्या 2 हजाराच्या सर्व नोटा बँकांमध्ये जमा होतील, असा आमचा अंदाज आहे.