मध्य रेल्वेवरही लोकलला रांगांचा प्रयोग

सामना प्रतिनिधी । मुंबई

पश्चिम रेल्वेच्या काही प्रमुख रेल्वे स्थानकांत महिलांना लोकलच्या डब्यात रांगेत सोडण्यासाठी आरपीएफची तैनाती करण्यात आली आहे. हाच प्रयोग आता पुन्हा मध्य रेल्वेच्या बदलापूर, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे स्थानकातही करण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेवर अंधेरी स्थानकात सध्या महिला कोचसमोर महिला प्रवासी रांगेने लोकलमध्ये चढत आहेत. तसाच प्रयोग पश्चिम रेल्वे आता बोरिवली, वांद्रे आणि भाईंदरसारख्या गर्दीच्या स्थानकात करणार आहे. मध्य रेल्वेनेही पूर्वी हा प्रयोग बदलापूर तसेच डोंबिवलीसारख्या स्थानकात केला होता. मात्र डोंबिवलीत कल्याणला जाऊन महिला रिटर्न प्रवास करीत येत असल्याने महिलांमध्येच वाद होऊ लागल्याने हा प्रयोग थांबविण्यात आला होता, अशी माहिती मध्य रेल्वेचे आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी स्पष्ट केले. आता पुन्हा आम्ही बदलापूर, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे स्थानकात ‘रांगेने लोकल प्रवास’हा प्रयोग करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आय वॉच ऍपही आणणार
पश्चिम रेल्वेप्रमाणे मध्य रेल्वेवरही महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘आय वॉच’ हे मोबाईल ऍप लाँच करण्यात येणार असल्याचेही विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या