नौदलाचा हुंकार! हिंदी महासागरात जगातील घातक पाणबुडी

67

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थान आणि चीनमध्ये डोंगलाम सीमेवरून सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थिती जैसे थे असून दोन्ही देश माघार घेण्यास तयार नाहीत. चीनने सीमेवर सैन्याची जमवाजमाव सुरू केली आहे तसेच हिंदी महासागरात पाणबुड्या तैनात करत हिंदुस्थानवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र चीनच्या कोणत्याही धमक्यांना न जुमानता हिंदुस्थानही चोख उत्तर देण्यासाठी सज्ज होत आहे.

हिंदुस्थान आपल्या नौदलाची ताकद वाढवण्यासाठी जगातील सर्वात घातक स्कॉर्पिन पाणबुडी समुद्रात उतरवणार आहे. आयएनएस ‘कलवरी’ असे या पाणबुडीचे नाव आहे. जगातील सर्वात घातक पाणबुडी असा याचा नावलौकीक आहे. या पाणबुडीचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत गुप्तपणे शत्रुवर हल्ला करण्याची क्षमता. यामुळे शत्रुला क्षणात नामोहरण करण्याची क्षमता हिंदुस्थानला मिळणार आहे. समुद्रातील सर्वात खतरनाक शार्क माशावरून या पाणबुडीचे नाव ‘कलवरी’ असे ठेवण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदलाची ताकद वाढवण्यासाठी हिंदुस्थानने आयएनएस कलवरी सारख्या आणखी पाच पाणबुड्यांची फ्रान्सला ऑर्डर दिली आहे. हिंदुस्थानकडे सध्या १५ पाणबुड्या आहेत तर चीनकडे ६० पाणबुड्या आहेत. हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या हालचालींना लगाम घालण्यासाठी हिंदुस्थान नौदलाला अधिक अत्याधुनिक करण्यासाठी प्रयत्न करत आहे. नौदलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हिंदी महासागरात चीनची युआन क्लासची डिझेल पाणबुडी उतरली होती आणि अजुनही ती तिथेच असल्याचे सागरी सुरक्षेवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे.

हिंदुस्थानी बनावटीच्या ‘आयएनएस कलवरी’’ या पाणबुडीच्या उभारणीसाठी फ्रान्सच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सुमारे १७०० टन वजनाची ही पाणबुडी आहे. ‘आयएनएस कलवरी’ पाणबुडीची मुंबईतील माझगाव गोदीत २०१५मध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या