ऑस्ट्रेलियात हिंदुस्थानी क्रिकेटपटूंसोबत क्रिकेट फॅन्सनाही केले टार्गेट

फोटो प्रातिनिधीक

हिंदुस्थानी क्रिकेटपटूंसोबतच क्रिकेट फॅन्सनाही ऑस्ट्रेलियामध्ये वर्णद्वेषी शेरेबाजी, गैरवर्तणुकीचा सामना करावा लागला. सिडनी आणि ब्रिस्बेन कसोटीत मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह व वॉशिंग्टन सुंदर या हिंदुस्थानच्या क्रिकेटपटूंना उद्देशून ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी वर्णद्वेषी शेरेबाजी केली. सिडनी येथील कसोटीतच कृष्ण कुमार या हिंदुस्थानी संघाच्या फॅन्सला सिक्युरिटी गार्डकडून अपमानास्पद वागणूक मिळाली. तो घेऊन आलेल्या बॅनरला स्टेडियममध्ये परवानगी देण्यात आली नाही. तसेच तो सिक्युरिटी गार्ड त्याला म्हणाला, हिंदुस्थानात जाऊन वर्णद्वेषाचा मुद्दा उठव. या प्रकरणाची सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येणार आहे.

चार बॅनर घेऊन जायला परवानगी नाही

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा फॅन कृष्ण कुमार चार बॅनर घेऊन सिडनी क्रिकेट स्टेडियमबाहेर पोहोचला होता, पण सिक्युरिटी गार्डने त्याला हे बॅनर स्टेडियममध्ये घेऊन जाण्यास परवानगी दिली नाही. या बॅनरवर वर्णद्वेषाविरुद्ध मेसेज देण्यात आले होते. ‘मित्रांनो वंशवाद करू नका’, ‘प्रतिस्पर्ध्यांत चढाओढ असायला हवी, पण वर्णद्वेष नसावा’ आणि ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया, विविधता दाखवा प्लीज’ हे मेसेज त्या बॅनरवर लिहिले होते.

बॅनर गाडीमध्येच ठेवायला सांगितले

सिक्युरिटी गार्डने कृष्ण कुमारला यावेळी सांगितले की, वर्णद्वेषाचा मुद्दा उठवायचा असेल तर तो हिंदुस्थानात जाऊन उठवा, अन्यथा हे बॅनर गाडीमध्येच ठेवून या. कृष्णकुमारने हे बॅनर मुलांच्या पेपर रोलवर तयार केले होते. हे बॅनर मोठे नसतानाही स्टेडियममध्ये घेऊन जायला दिले नाही. ऑस्ट्रेलियन्सच्या या वर्तणुकीवर चोहोबाजूंनी टीका करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या