नगरमधील पदाधिकारी निवडीवरून भाजपअंतर्गत कुरघोडय़ा; राधाकृष्ण विखे- पाटील – राम शिंदेंमध्ये चुरस

भाजपच्या नगर जिल्हाध्यक्षांसह इतर निवडी लवकरच जाहीर होणार असून, इच्छुकांनी त्यासाठी फिल्डिंग लावली आहे. मात्र, राज्य कार्यकारिणी सदस्य राम शिंदे आणि पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडून पदाधिकारी निवडीत आपापल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यातूनच अंतर्गत कुरघोडय़ा सुरू झाल्या आहेत.

भाजपांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे. मध्यंतरीच्या काळात मागील पदाधिकाऱयांना मुदतवाढ देण्यात आलेली होती. त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे नव्याने निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टिकोनातून पदाधिकाऱयांनी दावे-प्रतिदावे करण्यास सुरुवात केली आहे. नगर जिल्हा भौगोलिकदृष्टय़ा मोठा असल्यामुळे नगर उत्तर व नगर दक्षिण असे जिह्याचे दोन भाग केले आहेत. तर, नगर शहरासाठी स्वतंत्र असा शहर जिल्हाध्यक्ष नेमलेला आहे. दोन जिल्हाध्यक्षांकडे या जिह्याचा कारभार सोपवण्यात आलेला आहे. त्यातच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक घडामोडी घडत आहेत. आगामी भाजपच्या अंतर्गत निवडीतही अशाच राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

आगामी काळात जिल्हा परिषद, त्यापाठोपाठ लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे पदाधिकारी निवडीची धावपळ सध्या सुरू आहे. दुसरीकडे भाजपच्या पदाधिकाऱयांनी प्रदेश भाजपला पदाधिकारी निवडीची नावे कळविली आहेत. त्यातच आता जिल्हाध्यक्षपदावर आजी-माजी आमदारांनी दावा सांगितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, पालकमंत्री विखेही आपल्या कार्यकर्त्यांसाठी जोर लावणार आहेत. त्यामुळे जिह्यामध्ये भाजपमध्ये गटातटाचे राजकारण सुरू झाले आहे. आमदार राम शिंदे यांना भाजपने आमदारकी देऊन त्यांना राज्य कार्यकारिणीचे सदस्यसुद्धा केले आहे. त्यामुळे जिह्यामध्ये आता विखे व राम शिंदे एकत्र येणार का, हासुद्धा चर्चेचा विषय आहे. दरम्यान, गेल्या विधानसभेत विखेंनी भाजपच्या ‘त्या’ पाचजणांना पाडण्याचा विषयही अद्यापि संपलेला नाही, त्यामुळे आता अंतर्गत कुरघोडय़ा होण्याची शक्यता आहे.

राहुरी तालुकाध्यक्ष निवड लांबणीवर

 राहुरी तालुका भाजपाध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत राहुरी येथील मुळा- प्रवरा संस्था कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी तालुकाध्यक्ष विक्रम तांबे, नानासाहेब गागरे, माजी सुरेशराव बानकर, सुभाष गायकवाड, रवींद्र म्हसे, सर्जेराव घाडगे आदींसह 28 कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इच्छुकांची संख्या वाढल्याने निर्णय प्रमुख नेत्यांच्या उपस्थित जिल्हास्तरीय कोअर कमिटीची बैठक घेऊन इच्छुक 28 पैकी एका व्यक्तीचे नाव दिल्यास त्वरित अध्यक्ष जाहीर करू, सर्वांनी एकमत करावे, असे जिल्हाध्यक्ष मुंडे यांनी सांगितले; परंतु एकमत झालेच नाही. त्यामुळे खासदार डॉ. सुजय विखे, शिवाजी कर्डिले, चंद्रशेखर कदम, आमदार राम शिंदे हे निर्णय घेतील, असे मुंडे यांनी जाहीर केले.