राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले, पंचगंगा नदीची वाटचाल धोकापातळीकडे

radhanagari-dam

कोल्हापूर जिल्ह्यात दुसऱया दिवशी संततधार पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून, धरण पाणलोटक्षेत्रातील अतिवृष्टीही कमी झाली आहे. मात्र, पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने यंदाच्या वर्षी प्रथमच राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. धरणातून सात हजार 312 क्युसेकने विसर्ग सुरू होता. दरम्यान, काल रात्री 10च्या सुमारास 39 फुटांची इशारापातळी ओलांडलेल्या पंचगंगा नदीची पाणीपातळी बुधवारी सायंकाळी 41 फुटांवर गेली होती. त्यात तासाला इंचाने वाढ होत असून, नदीची वाटचाल 43 फुटांच्या धोकापातळीकडे सुरू झाली आहे. संभाव्य पूरस्थितीचा फटका बसणाऱ्या भागातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात येऊ लागले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात यापूर्वी आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडताना प्रशासनाकडून संभाव्य पूर स्थितीचा फटका बसणाऱ्या करवीर तालुक्यातील चिखली शहरातीलही नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरासाठी आवाहन करण्यात येत होते. त्यानुसार रात्रीपासूनच काहीजणांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात केली. शहरात सुतार वाडय़ातील 60, पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगावच्या 22, तर चिखलीतील 1 हजार 553 जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

राधानगरी धरण आज पहाटे पाचच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे साडेपाचच्या सुमारास धरणाचा सहा नंबरचा स्वयंचलित दरवाजा खुला झाला. त्यामधून 1 हजार 428 आणि पॉवर हाऊसमधून 1 हजार 600 असा एकूण 3 हजार 28 क्युसेक विसर्ग सुरू होता. सकाळी 8.55 वाजता पाचव्या क्रमांकाचा दरवाजा उघडला, तर दुपारी 2.20 वाजता तिसऱया आणि 3.20 वाजता चौथ्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला. पॉवर हाऊसमधील 1 हजार 600 आणि या चारही स्वयंचलित दरवाजांमधून असा एकूण 7 हजार 312 क्युसेकने विसर्ग सुरू होता.

काही धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत घट होत आहे. त्यामुळे या धरणांतील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्गात काहीशी घट करण्यात आली. यामध्ये कासारी धरणातून होत असलेल्या 1 हजार 90 मध्ये 730 क्युसेक घट करण्यात आली. कुंभी धरणातून सोडण्यात विसर्गात 400 क्युसेक घट करत 500 क्युसेक विसर्ग करण्यात आला.

‘अलमट्टी’तून दोन लाख क्युसेकचा विसर्ग

n गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार व अतिवृष्टीमुळे येथील नद्या-नाल्यांना पूर आला आहे. विशेष म्हणजे जिह्यातील धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. महापुराचा धोका जाणवत असताना कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिह्यात उद्भवणाऱया महापुरासाठी जबाबदार धरण्यात येणाऱया कर्नाटकातील अलमट्टी धरणातून विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येत आहे. त्यामुळे या तिन्ही जिह्यांतील संभाव्य महापुराच्या भीषणतेवर तूर्त नियंत्रण मिळविण्यात जलसंपदा विभागाला यश आले आहे. अलमट्टी धरणातून दोन दिवसांपासून दीड लाख क्युसेक विसर्ग सुरू असल्याने, कोल्हापूर जिह्यातील शिरोळ तसेच सांगली जिह्याला पुरापासून मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले असून, त्यातून होणाऱया विसर्गामुळे नद्यांची पाणीपातळी वाढत आहे. शिवाय कोयना धरणातूनही मोठय़ा प्रमाणात विसर्गाची शक्यता असल्याने अलमट्टी धरणातून पूर नियंत्रणासाठी आज दुपारनंतर पावणे दोन लाख क्युसेकने विसर्ग करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित

n कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिह्यांत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरस्थितीत शिवाजी विद्यापीठाच्या बुधवारी (दि. 10) व गुरुवारी (दि. 11) होणाऱया परीक्षा स्थगित करण्यात आल्या. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे शिवाजी विद्यापीठाकडून सांगण्यात आले.