राफेल नदालची विम्बल्डन, ऑलिम्पिकमधून माघार

स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस आणि टोकियो ऑलिम्पिक या स्पर्धांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. शारीरिक थकवा जाणवत असल्याने आपण या स्पर्धांमधून माघार घेत असल्याचे नदालने जाहीर केले.

विम्बल्डन टेनिस स्पर्धा सुरू होण्याच्या 11 दिवस आधी राफेल नदालने हा माघारीचा निर्णय घेतला आहे. टोकियो ऑलिम्पिक 23 जुलैपासून सुरू होणार आहे. राफेल नदालला फ्रेंच ओपन स्पर्धेच्या उपांत्य लढतीत सर्बियाच्या नोवाक जोकोवीचकडून पराभूत व्हावे लागले. चार तासांहून अधिक वेळ रंगलेल्या या लढतीत नदालची चांगलीच दमछाक झालेली दिसली. जोकोवीचने 3-6, 6-3, 7-6, 6-2 अशी बाजी मारत फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठली होती.

 ‘‘फ्रेंच ओपन स्पर्धा खेळून केवळ दोनच आठवडे झाले आहेत. पुन्हा विम्बल्डन आणि त्यानंतर टोकियो ऑलिम्पिक खेळण्यासाठी मनाची तयारी नाहीये. या घडीला माझ्या शरीराला आरामाची गरज आहे. म्हणून मी विम्बल्डन व ऑलिम्पिकमधून माघार घेण्याचा निर्णय घेत आहे.’’
– राफेल नदाल

आपली प्रतिक्रिया द्या