शस्त्रपूजन तमाशा नाही, ती आपली जुनी परंपरा! काँग्रेसला घरचा आहेर

1759

विजयादशमीच्या मुहूर्तावर हिंदुस्थानला फ्रान्सकडून पहिले राफेल लढाऊ विमान मिळाले. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे मंगळवारी फ्रान्सला गेले होते त्यांच्याकडे पहिले राफेल सोपवण्यात आले. यावेळी त्यांनी हिंदू परंपरेप्रमाणे राजनाथ सिंह यांनी राफेलवर आपल्या हाताने ‘ॐ’ गिरवला. पवित्र मंत्राचे उच्चारण यावेळी करण्यात आले. तसेच पवित्र रक्षा दोरा देखील विमानाच्या पंखांना गुंढाळण्यात आला. या शस्त्रपूजनावरून देशामध्ये गदारोळ सुरू झाला आहे. विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. परंतु आता त्यांच्यातच फूट पडल्याचे समोर आले आहे.

राफेलवर ‘ॐ’ गिरवला, संरक्षणमंत्र्यांकडून फ्रान्समध्ये विधीवत शस्त्र पूजन

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राफेलची पूजा म्हणजे तमाशा असल्याचे म्हटले होते. याला मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपण यांनीच विरोध केला आहे. शस्त्र पूजा हा तमाशा नसतो, तर ती आपली जुनी परंपरा आहे, असे म्हणत काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी खरगे यांच्यावर निशाणा साधला आहे. खर्गे हे नास्तिक आहेत, पण काँग्रेसमधील प्रत्येक जणच नास्तिक नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पॅरिसमध्ये राफेल विमानाची पूजा केली आणि चाकाखाली लिंबूही ठेवले. यावर मल्लिकार्जुन खरगे यांनी टीका केली. आम्ही बोफोर्ससारखी शस्त्र आणली तेव्हाही त्याची पूजा केली नव्हती, असे ते म्हणाले. पॅरिसमध्ये जे सुरु होते, तो एक तमाशा होता, अशी टीका त्यांनी केली होती.

खरगे-निरुपम बिनसलं
संजय निरुपम यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. निवडणुकीच्या तयारीसाठी खरगे यांनी बोलावलेली बैठक 15 मिनिटात संपवण्यात आली. यावेळी त्यांनी (खरगे) कुणाला काहीही बोलू दिले नाही. असे नेते काँग्रेसला वाचवणार की बुडवणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या