मुखर्जीनंतर रघुराम राजन यांना संघ परिवाराचे निमंत्रण

20

सामना ऑनलाईन । मुंबई

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जीपाठोपाठ रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना संघ परिवारातील कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आले आहे. विश्व हिंदू परिषद आणि अमेरिकेतील हिंदू संघटनांनी शिकागोमध्ये आयोजित केलेल्या ‘विश्व हिंदू काँग्रेस’ कार्यक्रमासाठी राजन यांना हे निमंत्रण देण्यात आलंय. संघ परिवारातील संस्थांकडून दर चार वर्षांनी विश्व हिंदू काँग्रेसचे आयोजन करण्यात येते.  स्वामी विवेकानंद यांच्या ऐतिहासिक भाषणाला सप्टेंबर २०१८ मध्ये १२५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने यंदा शिकागोमध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

शिकगोमध्ये होणारा हा कार्यक्रम भव्य – दिव्य करण्यासाठी जोरदार तयारी सुरु झालीय. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, तिबेटी धर्मगुरु दलाई लामा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हॉलीवूड स्टार रिचर्ड गेयर, अमेरिकी काँग्रेसच्या सदस्या तुलसी गबार्ड हे पाहुणेही या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे. संपूर्ण जगात हिंदुची परिणामकारक आणि सशक्त प्रतिमा प्रस्थापित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे आयोजकांनी स्पष्ट केले.

संघ परिवारातील आर्थिक संघटनांनी रघुराम राजन यांच्या आर्थिक धोरणांना जोरदार विरोध केला होता. त्या पापर्श्वभूमीवर राजन यांना हे निमंत्रण देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. राजन यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले असून ते या कार्यक्रमाला उपस्थित राहावे यासाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील तृतीय वर्षाला माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मुखर्जी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मुखर्जी यांनी हे निमंत्रण स्वीकारल्याने काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या