140 दिवस तुरुंगात असलेल्या अभिनेत्रीला अखेर जामीन मिळाला

ड्रग्जप्रकरणी अटकेत असलेल्या अभिनेत्रीला तब्बल 140 दिवसांनंतर जामीन मिळाला आहे.  सर्वोच्च न्यायालयाने रागिणी द्विवेदी हिला दिलासा देत जामीन मंजूर केला आहे.  4 सप्टेंबरला रागिणीला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ती तुरुंगातच होती.  कर्नाटक उच्च न्यायालयाने रागिणीला जामीन नाकारला होता. न्यायालयाच्या या आदेशाविरोधात रागिणीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायमूर्ती रोहिंग्टन नरीमन आणि न्यायमूर्ती के.एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला सारत रागिणीला जामीन मंजूर केला.  रागिणीला अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेलेलं असताना तिने जाम गोंधळ घातला होता.   रागिणीला बंगळुरूतील एका रेव्ह पार्टी प्रकरणी अटक करण्यात आली होती.  तिच्यावर आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी संबंध असल्याचाही आरोप करण्यात आला होता.  तिला NDPS कायद्या अंतर्गत अटक करण्यात आली होती.

रागिणीतर्फे सिद्धार्थ लुथरा यांनी न्यायायलयात बाजू मांडली होती. त्यांनी युक्तिवाद करताना म्हटलं होतं की रागिणी 140 दिवस कोठडीत आहे मात्र तिच्यासोबत अटक करण्यात आलेले मात्र जामिनावर सुटले आहेत. रागिणीकडे अंमली पदार्थ सापडले नव्हते, तिने 0.5 ग्रॅमपेक्षा कमी अंमली पदार्थांचे सेवन केलं होतं असं   लुथरा यांनी म्हटलं.  कर्नाटक उच्च न्यायालयाने रागिणीला जामीन नाकारताना म्हटलं होतं की तिच्यात आणि ड्रग्ज तस्करांमध्ये संभाषण झालं होतं.  याशिवाय ती पुराव्यांसोबत छेडछाड करण्याची शक्यता असल्याने तिला जामीन नाकारण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या