चक्रीवादळाच्या व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे – पालकमंत्री उदय सामंत

506

चक्रीवादळ आणि कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व संबंधीत विभागांनी साधन सामुग्रीसह सज्ज रहावे असे आदेश सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. तसेच रेल्वे, रस्ते वाहतूक, महामार्गाची अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करावीत असेही त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहामध्ये आयोजित केलेल्या मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.

चक्रीवादळाचा धोका वाढला असून सर्व यंत्रणांनी अत्यंत सतर्क रहावे असे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गाची 85 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरीत कामे तातडीने पूर्ण करावीत. राष्ट्रीय महामार्गाबाबत भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. जिल्ह्याच्या संपर्कासाठी महत्त्वाचे घाट रस्ते सुरू राहण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. घाट मार्गावर कोसळणाऱ्या दरडींबाबतची माहिती तातडीने मिळावी व त्या हटवता याव्यात. तसेच रस्त्यावर पडणारी झाडे, मुख्यतः आंबोली घाटामध्ये, त्वरित हटवता यावीत यासाठी महसूल, वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागांनी समन्वय ठेवावा असे सामंत म्हणाले.

शोध व बचाव साहित्य अद्ययावत ठेवावे. आरोग्य विभागाने पावसाळ्यातील साथरोग नियंत्रणाबाबत दक्षता घ्यावी. स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. पुरामुळे दूषित होणाऱ्या पाणीसाठ्यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठीची यंत्रणा सज्ज ठेवावी. वीज पुरवठा सुरळीत सुरू राहण्याबाबत संबंधित विभागाने दक्षता घ्यावी. पूर क्षेत्रातील नागरिकांना निवाऱ्यासाठीची यंत्रणा तयार ठेवावी, पावसाळा कालावधीत पाटबंधारे विभागाने धरणातील पाण्याच्या विसर्गाची माहिती विहित वेळेत नदी काठच्या गावांना द्यावी, विशेषतः तिलारी धरण क्षेत्रामध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी सतर्क रहावे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठा व विसर्ग यांची दैनंदिन माहिती महसूल विभागास व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षास कळवावी, मस्त्य विभागाने पर्ससिन नेट मासेमारीस आळा घालण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात आदी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी या बैठकीत केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या