भंगार वेचणाऱ्याने स्वत:चा पुतळा उभा केला, उभारणीची किंमत ऐकून चाट पडाल

photo courtsey- www.allianz.com

तमिळनाडू मधल्या सालेम जिल्ह्यातील 60 वर्षांचा एक भंगार वेचणारा कालपर्यंत कोणाला माहितीही नव्हता. आजमात्र त्याची चर्चा फक्त राज्यातच नाही तर राज्याबाहेरही व्हायला लागली आहे. वाल्लापदी गावात राहणाऱ्या या भंगार वेचणाऱ्याने स्वत:च 5 फूट उंच पुतळा तयार केला आहे. आयुष्यात आजपर्यंत नाव कमावले नव्हते आता आपले नाव सगळ्यांना परिचित व्हावे यासाठी त्याने स्वत:चा पुतळा तयार करायचाच असा मनाशी चंग बांधला होता.

नल्लाथतंबी अत्थानुरपत्ती असं या भंगार वेचणाऱ्याचे नाव आहे. त्याच्या आयुष्यातील बरीच वर्ष रस्त्यावर पडलेल्या रिकाम्या बाटल्या वेचण्यात गेलं. आपण वयाने मोठे होत गेलो पण समाजात आपले नाव नाही अशी खंत त्याला सतावत होती. यावर मात करण्यासाठी त्याने स्वत:चा पुतळा उभारायचं ठरवलं होतं. पुतळा तर बनेल मात्र तो उभा कुठे करायचा असा नल्लाथंबीला प्रश्न होता. यासाठी त्याने जागा शोधायला सुरुवात केली. त्याने ही जागा शोधली आणि तिच्या मालकाकडून ती विकत घेतली. नल्लाथंबीने एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले की ” मला लहानपणापासून नाव कमवावे असे वाटत होते, मला माझा पुतळा उभारायचा होता आणि आज माझे स्वप्न पूर्ण झाले आहे.”

नल्लाथंबी याची बायका-मुलं सालेम जिल्ह्यातच एका गावात राहातात. घरच्यांशी न पटल्याने त्याने 20 वर्षांपूर्वी घर सोडून दिलं होतं. पूर्वी नल्लाथंबी गवंडी काम करायचा, तेव्हापासून त्याने पैसे जमवायला सुरुवात केली होती. भंगार वेचून नल्लाथंबीला दिवसाला 300 रुपयांच्या आसपास रक्कम मिळते. त्यातली थोडी-थोडी रक्कम बाजूला काढत त्याने 1200 स्क्वेअर फीटची जागा विकत घेतली. वाल्लापदी-बेलूर रस्त्यावर ही जागा असून त्या जागेत पुतळा उभारायचं त्याने निश्चित केलं होतं. एका शिल्पकाराने नल्लाथंबीने गाठला आमि स्वत:चा पुतळा त्याच्याकडून बनवून घेतला. यासाठी आपण त्याला 1 लाख रुपये दिल्याचे त्याने सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या