अंतिम सामना हरल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये काय परिस्थिती होती? राहुल द्रविडने सांगितला प्रसंग

क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर घोर निराशा दिसून आली. मोहम्मद सिराज आणि रोहित शर्मा यांना भावनावेगाने रडूही फुटलं. त्यांचे अश्रू पाहून क्रिकेटप्रेमी हिंदुस्थानी नागरिकांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. या पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये काय चित्र होतं, याबाबत संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी खुलासा केला आहे.

अंतिम सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यानेही आपलं मनोगत व्यक्त केलं. पराभवामुळे सर्वच खेळाडूंचा अपेक्षाभंग झाला आहे. ड्रेसिंग रुममध्ये प्रचंड भावनिक वातावरण होतं. एक प्रशिक्षक म्हणून त्या सर्वांना असं पाहाणं फार अवघड होतं. त्यांनी या स्पर्धेसाठी केलेल्या असंख्य तडजोडी आणि केलेली प्रचंड मेहनत आपण सगळ्यांनी पाहिली आहे. याचसोबत बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून ड्रेसिंग रूमचा फोटो शेअर केला. त्या फोटोत पराभवाची निराशा प्रत्येक खेळाडूच्या आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर सुस्पष्टपणे दिसत होती.