हिंदुस्थान-श्रीलंका क्रिकेट मालिका, राहुल द्रविड होणार टीम इंडियाचे प्रशिक्षक

युवा क्रिकेटपटूंना अमूल्य मार्गदर्शन करीत हिंदुस्थानची बेंच स्ट्रेंथ निर्माण करणारे महान क्रिकेटपटू राहुल द्रविड यांच्या खांद्यावर हिंदुस्थानच्या सीनियर क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हिंदुस्थानचे दोन संघ एकाच कालावधीत आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहेत.

विराट कोहलीची सेना इंग्लंडशी दोन हात करील. या संघाला रवी शास्त्री अॅण्ड कंपनीचे मार्गदर्शन लाभणार आहे. याचदरम्यान टीम इंडियाचा दुसरा संघ श्रीलंकेत वन डे व टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी राहुल द्रविड यांची निवड करण्यात येईल, असे वृत्त मीडियामधून समोर आले आहे. तसेच या दौऱयात राष्ट्रीय क्रिकेट अॅकडमीतील सपोर्ट स्टाफचेही खेळाडूंना मार्गदर्शन लाभणार आहे. अनुभवी क्रिकेटपटू शिखर धवन व अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांडय़ा यांच्यापैकी एकाकडे या संघाचे नेतृत्व सोपवण्यात येईल, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून यावेळी देण्यात आली.

5 जुलैला लंकेत पोहोचणार

विराट कोहलीविना मैदानात उतरणारा हिंदुस्थानी क्रिकेट संघ 5 जुलै रोजी श्रीलंकेत पोहोचणार आहे. यानंतर हिंदुस्थान-श्रीलंका यांच्यामध्ये वन डे व टी-20 सामन्यांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. वन डे मालिकेतील लढती 13, 16 व 19 जुलै रोजी पार पडतील. तसेच टी-20 लढती 22, 24 व 27 जुलै रोजी होतील.

प्रेमदासा स्टेडियममध्ये लढती रंगतील

हिंदुस्थान-श्रीलंका यांच्यामधील तीन वन डे व तीन टी-20 लढती एकाच स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येणार आहे. जास्त प्रवास टाळण्यासाठी एकाच स्टेडियममध्ये सहाही लढती खेळवण्यात येणार आहेत. कोलंबोमधील प्रेमदासा स्टेडियममध्ये या लढती पार पडतील.

आपली प्रतिक्रिया द्या