‘वायनाड की रायबरेली’ कोणती जागा निवडणार? राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वायनाड आणि रायबरेली अशा दोन्ही लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले राहुल गांधी कोणता मतदार संघ सोडणार याकडे साऱ्या देशाचं लक्षं लागलं आहे. यासंदर्भात खुद्द राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितलं की त्यांनी कोणता मतदारसंघ सोडावा या संभ्रमात ते आहेत.

मात्र जो काही निर्णय घेतला जाईल, त्यातून दोन्ही मतदारसंघांना त्याचा आनंद होईल, असंही त्यांनी सांगितलं.

केरळच्या मलप्पुरम येथे एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी लोकसभेत दुसऱ्यांदा निवडून दिल्याबद्दल वायनाडच्या जनतेचे आभार मानले आणि म्हणाले, ‘मी लवकरच तुम्हाला भेटण्यास उत्सुक आहे’.

‘माझ्यासमोर एक पेच आहे की, मी वायनाडचा खासदार व्हायचं की रायबरेलीचा. मी तुम्हाला असं वचन देतो की म्हणजे वायनाड आणि रायबरेली दोघेही माझ्या निर्णयावर खूश असतील’, असं काँग्रेस नेते एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

रॅलीमध्ये, काँग्रेस नेत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली आणि म्हणाले की देवाने पंतप्रधानांना देशातील प्रमुख विमानतळ आणि वीज प्रकल्प अदानीकडे सोपवण्याचे निर्देश दिले.

‘दुर्दैवाने, मला देवाचे मार्गदर्शन मिळालेले नाही, मी एक माणूस आहे. नरेंद्र मोदींचा ‘परमात्मा’ त्यांना सर्व निर्णय अंबानी आणि अदानींच्या बाजूने घेण्यास भाग पाडतो. माझ्याकडे ही लक्झरी नाही. खरं तर, माझ्यासाठी हे खूप सोपे आहे. माझा देव हिंदुस्थानातील गरीब लोक आहेत, माझ्यासाठी फक्त लोकांशी बोलणे सोपे आहे आणि हा माझा देव मी काय करावं ते मला सांगतो’, असं ते म्हणाले.

वायनाड मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा मोठ्या फरकाने विजयी झाल्यानंतर राज्यात राहुल गांधी पहिल्यांदाच हजर झाले होते.

2024 च्या लोकसभा निवडणुकीतील लढा हा देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी होता आणि त्या लढ्यात द्वेषाचा प्रेम आणि आपुलकीनं, अहंकाराचा नम्रतेनं पराभव झाल्याचेही त्यांनी आपल्या भाषणादरम्यान सांगितलं.

पंतप्रधान मोदींना आता आपला दृष्टिकोन बदलावा लागेल कारण देशातील जनतेने त्यांना स्पष्ट संदेश दिला आहे, असंही गांधी म्हणाले. तसेच केंद्रात स्थापन झालेल्या सरकारचा ‘पंगू’ सरकार असल्याचा उल्लेख त्यांनी केला.