श्रीमंतांचे कर्ज माफ करता, मग शेतकऱ्यांचे का नाही; राहुल गांधींचा सवाल

46

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

श्रीमंत उद्योगपतींचे लाखो कोटींचे कर्ज भाजप सरकारकडून माफ केले जाते, मग शेतकऱ्यांचे कर्ज का माफ करू शकत नाही? हे सरकार शेतकऱ्यांना कमी महत्त्वाचे समजत आहे का, असा सवाल राहुल गांधी यांनी केला. केरळमध्ये कर्जाची परतफेड न केलेल्या 8000 शेतकऱ्यांना बँकांनी नोटिसा बजावल्या आहेत. वायनाडसह केरळमध्ये आतापर्यंत 18 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. लोकसभेत राहुल गांधी यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. गेल्या पाच वर्षांत या सरकारने श्रीमंत उद्योगपतींचे 5.50 लाख कोटींचे कर्ज माफ केले तर 4.50 लाख कोटींची सवलत दिली, पण शेतकऱ्यांचे कर्ज हे सरकार माफ करीत नाही. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सरकारने करायला हवी असे राहुल गांधी म्हणाले.

शेतकऱ्यांच्या दुर्दशेला काँग्रेस जबाबदार

 शेतकऱ्यांची दुर्दशा गेली दोन किंवा चार वर्षांत झालेली नाही. ज्यांनी अनेक वर्षे देशावर राज्य केले तेच या दुर्दशेला जबाबदार आहेत अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले. काँग्रेसच्या कार्यकाळात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. भाजप सरकारकडून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना सर्वाधिक हमीभाव दिला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न आमचे सरकार करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने आमचे सरकार पूर्ण करेल असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या