लंडनमधील विधानाचे संसदीय समितीच्या बैठकीत पडसाद, भाजपकडून घेरण्याचा प्रयत्न; राहुल गांधींच्या उत्तराने बोलती बंद

rahul-gandhi-new

काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ब्रिटन दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्यावर जोरदार टीका केली होती. याचे पडसाद संसदेमध्येही उमटले होते. यानंतर आता संसदीय समितीच्या बैठकीमध्येही भाजप खासदार आणि राहुल गांधी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. यावेळी भाजप खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना राहुल गांधी यांनी सडेतोड उत्तर देत त्यांची बोलती बंद केली.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखालील हिंदुस्थानच्या G-20 अध्यक्षपदावरील सल्लागार समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये काँग्रेसचे वायनाड मतदारसंघाचे खासदार राहुल गांधीही सहभागी झाले होते. या बैठकीमध्ये लंडनमध्ये राहुल गांधी यांनी हिंदुस्थानच्या लोकशाहीबाबत दिलेल्या विधानावरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

भाजप खासदार आणि काँग्रेस खासदार यांच्यात तूतू-मेमे झाली. राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर बोलण्याचे हे व्यासपिठ नसल्याचे म्हटले. परंतु भाजप खासदारांनी आडमुटेपणाची भूमिका घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी लंडन भेटीदरम्यान केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. आपण कोणत्याही देशाला यात हस्तक्षेप करण्यास सांगितले नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.

राहुल गांधी म्हणाले की, मी लंडनमध्ये देशातील लोकशाहीच्या सद्यस्थितीवर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र कोणत्याही परकीय देशाच्या हस्तक्षेपाची मागणी केली नाही. तसेच ही आमची अंतर्गत बाब असून आम्ही यावर तोडगा काढू असेही म्हटल्याचे त्यांनी सांगितले. भाजपने आरोप केलेत तसे एकही देशद्रोही विधान आपण केले नसल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले.

दरम्यान, देशातील लोकशाहीला धोका असल्याच्या तुमच्या विधानाशी मी असहमत असल्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले. यानंतर राहुल गांधी यांनी तुम्ही असहमत असाल, पण मी माझ्या विधानावर कायम असल्याचे उत्तर दिले.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून गदारोळ, सत्ताधाऱ्यांनीच संसदेचे कामकाज बंद पाडले!