काँग्रेसचा ‘पंजा’ हिसकावण्याच्या तयारीत भाजप; निवडणूक आयोगाकडे घेतली धाव

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी काँग्रेसचं निवडणूक चिन्ह बदलण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अपील केलं आहे. मानवी शरीरातील कोणताही भाग निवडणूक चिन्ह नसावा असा तर्क त्यांनी यासाठी लावला आहे. त्यामुळे अशा प्रकारे शरीराच्या अवयवाला निवडणूक चिन्ह म्हणून वापरण्याची परवानगी मिळाली नाही पाहिजे, असंही ते म्हणाले.

उपाध्याय यांनी सांगितलं की, निवडणूक आयोगानं याआधी काँग्रेसला ‘बैलांच्या जोडी’चं चिन्ह दिलं होतं. या चिन्हासह काँग्रेसनं चार साधारण निवडणुका लढविल्या होत्या. त्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगानं काँग्रेसला एक गाय आणि तिचं वासरू दुध पितानाचं चिन्ह दिलं होत. त्यानंतर पक्षाच्या विभाजनानंतर निवडणूक आयोगानं काँग्रेसला हाताचा ‘पंजा’ हे चिन्ह दिलं होतं.

सहा राष्ट्रीय पक्षांमध्ये केवळ काँग्रेसला शरीराच्या एखाद्या शरीराच्या अंगाचं निशाण देण्यात आलं आहे. तसेच ७५ राज्यस्तरीय पक्षांपैकी एकाही पक्षाला शरीराचा कोणताही अंग निवडणुकीचं चिन्ह म्हणून देण्यात आलेलं नाही. नियमानुसार मतदानाच्या ४८ तास आधी निवडणूक प्रचार थांबवला जातो. तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत कोणत्याही पक्षाचं निवडणूक चिन्ह दाखवलं जाऊ शकत नाही. मात्र काँग्रेस उमेदवार आपला हाताचा ‘पंजा’ दाखवून प्रचार करू शकतात, असा तर्क उपाध्याय यांनी लावला आहे.

मतदानाच्या दिवशीही काँग्रेस उमेदवार आपला हात दाखवत प्रचार करुन नागरिकांकडून मत मागत असतात. काँग्रेसच्या हाताच्या पंजा या चिन्हामुळे हे शक्य होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं काँग्रेसचं निवडणूक चिन्ह बदलावं, असं आवाहन उपाध्याय यांनी केलं आहे. तसेच काँग्रेसचं निवडणूक चिन्ह बदललं नाही गेलं तर निष्पक्ष निवडणुका होणार नाहीत, असंही ते म्हणाले.