अर्थव्यवस्थेचं करायचं काय?  पंतप्रधान,अर्थमंत्री ढिम्मच, राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्ला

535

ढेपाळलेल्या अर्थव्यवस्थेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. अर्थव्यवस्था डबघाईला आलीय. अशा परिस्थितीत तिला पूर्वपदावर आणायची कशी, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे कसलीच ठोस कल्पना नाही, अशा शब्दांत राहुल यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

केंद्र सरकार चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत असतानाच राहुल गांधींनी मोदी सरकारच्या ढिम्म कारभाराचे वाभाडे काढले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राहुल यांनी बुधवारी ट्विट केले. मोदी व त्यांच्या आर्थिक सल्लागारांच्या टीमने खरंच अर्थव्यवस्था बदलून टाकलीय. याआधी जीडीपी 7.5 टक्के तर महागाई दर 3.5 टक्के होता. आजच्या घडीला जीडीपी घसरून 3.5 टक्क्यांवर आला आहे, तर महागाई दर 7.5 टक्क्यांवर गेला आहे. अशा परिस्थितीत पुढे काय करायचे, याची कल्पना पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना नाही, असे ट्विट करीत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

घोषणा पुरे, आता खरे सांगा!चिदंबरम यांचा मोदींवर घणाघात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही बुधवारी मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर सडेतोड टीका केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्विट केले. लोकांना अर्थव्यवस्थेची वस्तुस्थिती, खरे आकडे ऐकण्याची उत्सुकता आहे. त्यांना तुमच्याकडून अपशब्द वा घोषणाबाजीची अपेक्षा नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्र्यांनी अर्थव्यवस्थेबाबत खऱया गोष्टी सांगाव्यात. मोदी सरकारला सहा वर्षे पूर्ण झाल्यामुळे लोक ’अच्छे दिन’चे काय झाले, असा सवाल करीत असल्याचेही चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या