सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राहुल गांधींची ‘ही’ प्रतिक्रिया

20

सामना ऑनलाईन । मुंबई

कर्नाटकमध्ये रंगलेल्या सत्तास्थापनेच्या नाटकावर न्यायालयाने भाजपला सर्वोच्च झटका दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार, शनिवारी ४ वाजता येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या येडियुरप्पा यांचं पद किती वेळ टिकणार हे शनिवारी ठरणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं आहे.

राज्यपाल वाला यांनी असंवैधानिक कृत्य केलं आहे, या आमच्या भूमिकेला सर्वोच्च न्यायालयाने पाठिंबा दिला आहे. बहुमत नसतानाही आम्ही सत्तास्थापन करू हा भाजपचा दावा न्यायालयाने खोडून काढला आहे. आता कायदेशीर मार्गाने थांबवल्यानंतर भाजपवाले पैसे आणि बळाचा वापर नक्की करतील, असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देखील येडियुरप्पा यांचं हे पद किती काळ टिकणार असा प्रश्न होता. कारण भाजपला अपेक्षित बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे १०४ संख्याबळ असतानाही भाजपची कसरत सुरू आहे. त्यात काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावल्यानं आता येडियुरप्पा यांना आपल्या सोबत असलेल्या ११२ आमदारांची यादी सादर करावी लागणार होती. न्यायालयात सुनावणी वेळी येडियुरप्पा यांच्याकडून मुकूल रोहतगी यांनी यादी दिली. पण यात संख्या नव्हती. अखेर दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर भाजपने शनिवारी दुपारी ४ वाजता बहुमत सिद्ध करावे असे आदेश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या