मोदी सरकारमुळे तीन कोटी युवकांचे रोजगार गेले, राहुल गांधींचा लोकसभेत हल्लाबोल

rahul-gandhi

देशात नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आल्यापासून 23 कोटी जनता दारिद्रय़रेषेखाली गेली आहे तर सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे तब्बल तीन कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. पंतप्रधान सतत न्यू इंडियाचा नारा देत असतात, मात्र या नाऱ्याने व जुमेलबाजी करून काहीही होणार नाही. एक गरीबांचा आणि एक श्रीमंताचा असे आपल्या देशाची स्थिती आहे. पंतप्रधानांनी आपला देश एकसंध ठेवावा, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज मोदी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलण्याचा पहिला मान आज राहुल गांधी यांना मिळाला. राहुल यांनीही जोरकस भाषण ठोकून संधीचे सोने केले. यूपीए सरकार सत्तेवर असताना आमच्या सरकारने तब्बल 27 कोटी जनतेला दारिद्रय़रेषेखालून बाहेर काढले होते. मोदी सरकारने नोटाबंदी, जीएसटी आणि सातत्याने चुकीचे निर्णय घेऊन देशातील 23 कोटी जनतेला दारिद्रय़ाच्या खाईत लोटले आहे, अशी टीका त्यांनी केली. सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे तीन कोटी जणांचे रोजगार गेले आहेत आणि सरकार रोजगार आणि बेरोजागारांच्या बाबतीत केवळ आकडे फिरवून त्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे, असा हल्लाबोल राहुल यांनी केला.