मेहबुबा मुफ्ती यांची सुटका करा, राहुल गांधींची मागणी; लोकशाही डळमळीत झाल्याचा आरोप

काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला असून जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांची सुटका करण्याची मागणी केली. ‘ज्या दिवशी नेत्यांना अटक करण्यात आली त्या दिवशी हिंदुस्थानच्या लोकशाहीला धक्का बसला’, असे राहुल गांधी म्हणाले. जम्मू-कश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला 1 वर्ष पूर्ण होत असून त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हे ट्विट केले आहे.

गेल्या वर्षी 5 ऑगस्टला जम्मू-कश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. या निर्णयानंतर कश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून हुर्रीयत नेते, माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी ओमर अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला यांची सुटका करण्यात आली. मात्र मेहबुबा मुफ्ती यांना आणखी 3 महिने बंधनात ठेवण्याचा निर्णय गेल्या शुक्रवारी झाला. यावरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारवर निशाणा साधला. ‘हिंदुस्थानमधील लोकशाही त्याच दिवशी डळमळीत झाली ज्या दिवशी केंद्र सरकारने अवैधरित्या नेत्यांना अटक केली. आता मेहबुबा मुफ्ती यांची सुटका करण्यात यावी’, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले.

चीन वादावरून टीकास्त्र
गेल्या काही महिन्यांपासून लडाखच्या पूर्व भागात चीनसोबत सुरू असलेल्या वादावरून राहुल गांधी केंद्रावर टीकास्त्र सोडत आहेत. चीनने हिंदुस्थानच्या भूमीत घुसखोरी केल्याचे सत्य सरकार लपवत असल्याचा आरोप ते करत आहेत. तसेच कोरोना रोखण्यात आलेले अपयश, लॉकडाऊन, ढासळती अर्थव्यवस्था यासारख्या मुद्द्यांवरून ते सातत्याने केंद्र सरकारला टार्गेट करत आहेत. कोरोना रोखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेले सरकार खोटी स्वप्न दाखवत आहेत, असा आरोप राहुल गांधी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या