महात्मा गांधी महिलांनी तर मोहन भागवत पुरुषांनी घेरलेले – राहुल गांधी

66

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाची (आरएसएस) पुन्हा एकदा खिल्ली उडवली आहे. राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांचे उदाहरण देत आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे. मेघालयमध्ये एका संभेला संबोधित करताना राहुल यांनी आरएसएसचे विचार महिलांविरोधात असल्याचे म्हटले आहे.

‘आरएसएसचे विचार महिलांना शक्तिहीन बनवण्याचा आहे. आरएसएसच्या कोणत्या प्रमुख पदांवर महिला आहेत? एकही नाही’, असे म्हणत काँग्रेस अध्यक्षांनी आरएसएसवर टीका केली. महात्मा गांधी यांचे फोटो पाहिले तर त्यांच्या दोन्ही बाजूला महिला दिसतात. मात्र जर तुम्ही आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचा फोटो पाहिला तर ते पुरुषांनी घेरल्याचे दिसून येतात, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर आरएसएस कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला आहे. ‘इंदिरा गांधी यांच्या कॅबिनेटमध्ये की महिला मंत्री होत्या? असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच आरएसएसमध्ये महिलांसाठी वेगळ्या शाखा आहेत, ज्याला राष्ट्र सेविका समिती असे म्हटले जाते असे एका युझरने म्हटले आहे.

आरएसएसवर हल्लाबोल करण्याचा राहुल यांची पहिलीच वेळ नाही. याआधीही गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात गुजरात दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी, ‘आरएसएसमध्ये एकही महिला शॉर्टस घातलेली पाहिली आहे का? मी तर नाही पाहिली. आरएसएसमध्ये महिलांचा समावेश करण्यास परवानगी का नाही? भाजपमध्ये अनेक महिला पदाधीकारी आहेत मात्र आरएसएसमध्ये मी कोणत्याही महिलेला पाहिले नाही, असे म्हटले होते. याला उत्तर देताना आरएसएसचे नेते मनमोहन वैद्य यांनी राहुल गांधी यांना पुरुषांच्या हॉकी सामन्यात महिला पाहायच्या आहेत. त्यांना महिला पाहायच्या असतील तर त्यांनी महिला हॉकी सामना पाहायला जावे, असा सल्ला दिला होता.

आपली प्रतिक्रिया द्या