…म्हणून माझी खासदारकी रद्द करण्यात आली, राहुल गांधी यांनी थेट वर्मावरच ठेवले बोट

देशाच्या लोकशाहीवर आक्रमण होत आहे आणि याची रोज नवनवीन उदाहरणे समोर येत आहेत, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नात्यावरही सवाल उपस्थित केला. त्यांना माझ्या पुढच्या भाषणाची भीती होती, म्हणून माझी खासदारकी रद्द केल्याचे राहुल गांधी म्हणाले.

मी फक्त एकच प्रश्न विचारला होता. अदानींच्या शेल कंपन्यांमध्ये 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कोणी केली? हा अदानींचा पैसा नाहीय , पैसे दुसऱ्याचेच आहेत. हे पैसे कोणी गुंतवले? असा सवाल आपण केल्याचे राहुल गांधी यांनी याची चौकशी करण्याची मागणी केली.

ते पुढे म्हणाले, संसदेत पुराव्यांसह अदानी आणि मोदींच्या नात्याबद्दल सविस्तर बोललो. दोघांमधील नातं नवीन नाहीत, जुनेच आहेत. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनले तेव्हापासूनचे हे नाते असून याचे सार्वजनिक पुरावेही आहेत. मी विमानातील फोटोही दाखवले. नरेंद्र मोदी आपल्या मित्रासोबत बसले आहेत. हाच प्रश्न मी विचारला. मी लोकसभा अध्यक्षांना याबाबत चिठ्ठीही लिहिली. पण पुढे काही झाले नाही.

हे देखील वाचा – “हा गांधीवाधी विचारसरणी अन् हिंदुस्थानच्या मूल्यांसोबत केलेला विश्वासघात”, राहुल गांधींवरील कारवाईचे अमेरिकेत पडसाद

संसदेमध्ये माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. मी प्रश्न विचारणे बंद करणार नाही. मोदींचे अदानीसोबत काय नाते आहे? आणि 20 हजार कोटी कोणाचे आहेत? खासदारकी रद्द करून, धमकी देऊन, तुरुंगात टाकून माझा आवाज बंद करू शकणार नाहीत. मी हिंदुस्थानच्या लोकशाहीसाठी लढतोय आणि लढत राहील. कोणाला घाबरणार नाही, हेच सत्य आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.